जिल्हा बँक व पोस्टातील जुन्या नोटा आरबीआय स्वीकारणार

0

नवी दिल्ली । राज्यातील जिल्हा बँकांमध्ये असणार्‍या जुन्या 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेत भरायला केंद्राने मंजूरी दिली आहे. पोस्ट आणि जिल्हा बँकेतील जुन्या नोटा आरबीआय स्विकारणार आहे. याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नोटीफिकेशन जारी केली असून यानुसार 30 जूनपर्यंत जिल्हा बँकांना त्यांच्याकडील जुन्या नोटा आरबीआयमध्ये भरता येणार आहेत. यामुळे जिल्हा बँकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आधी होता नकार
8 नोव्हेंबर 2016 रोजी रिझर्व्ह बँकेने 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर तीन दिवसांत जिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने जुन्या नोटा स्वीकारल्या होत्या. राज्यभरातील जिल्हा बँकांना सुमारे साडेसहा हजार कोटींच्या नोटा जमा झाल्या होत्या; पण या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने टाळाटाळ केली होती. या नोटाबाबत ‘नाबार्ड’ने दोनवेळा तपासणी केली तरीही रिझर्व्ह बँकेकडून नोटा स्वीकारण्याच्या कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

बँकांना दिलासा
’नोटाबंदीनंतर सर्वसामान्य लोकांनी जिल्हा बँकेत भरलेल्या जुन्या नोटा आरबीआयने घ्यायला नकार दिल्यामुळे बँका अडचणीत आल्या होत्या.पण केंद्राच्या या निर्णयामुळे जिल्हा बँकांना दिलासा मिळणार आहे. जिल्हा बँकांकडे हजारो कोटींच्या नोटा सहा महिने पडून असल्याने कोट्यवधी रुपयांचा व्याजाचा भुर्दंड बँकांना बसला आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांना कर्जवाटप करताना अडचणी येत होत्या. या निर्णयाने बँकांना दिलासा मिळाला आहे.