जळगाव । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची पुनर्बांधणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे गुरूवारी जिल्हा दौर्यावर येत आहेत. सत्तेत असल्यापासून राष्ट्रवादीतली दुही स्पष्टपणे अधोरेखित झाली असतांना आता सत्ता नसतांनाही अंतर्गत कलह दुर होत नसल्याची बाब उघड आहे. यामुळे कठोर निर्णय घेऊन दूरगामी परिणाम करणार्या निर्णयांची पक्षाला आवश्यकता आहे.
सर्वमान्य नेतृत्वाची गरज
राज्यात तब्बल तीन पंचवार्षिक इतक्या दीर्घ कालखंडापर्यंत सत्तेत असल्यावरही जिल्हा राष्ट्रवादीत एकमुखी नेतृत्व असल्याचे कधीही दिसून आले नाही. पहिल्या टप्प्यात ईश्वरलाल जैन, अरूणभाई गुजराती, सुरेशदादा जैन आणि वसंतराव मोरे यांच्यात फारसा सलोखा नव्हता. तर दुसर्या टप्प्यात ईश्वरबाबूजी, गुलाबराव देवकर आणि डॉ. सतीश पाटील यांच्यातील संबंधदेखील त्याच प्रकारचे होते. जिल्ह्यातील अन्य नेते आपापल्या पध्दतीने या मान्यवरांच्या गटांमध्ये विभाजीत झाले होते. कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी थेट मुंबईतील संबंधाच्या जोरावर आपल्या मतदारसंघात कामाची छाप टाकली पण त्यांचा पराभव झाला. तसेच तेदेखील जिल्हा नेतृत्व बनू शकले नाही. या पार्श्वभूमिवर, येत्या दोन वर्षात येऊ घातलेल्या महापालिका, लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याची धुरा समर्थ खांद्यांवर सोपविण्याची जबाबदारी अजितदादा पवार यांच्यावर आहे.
महानगराचा तिढा
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही हव्या त्या प्रमाणात पाळेमुळे मजबूत करण्यात अयशस्वी ठरली आहे. यातच पुढील वर्षी होणार्या महापालिका निवडणुकीची आतापासून तयारी केल्यास या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत पक्षाचे महानगराध्यक्षपद अत्यंत महत्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी या पदासाठी लेवा पाटीदार समाजाऐवजी अन्य अल्पसंख्य समाजातील पदाधिकार्याला प्राधान्य द्यावे अशी सूचना आल्यामुळे उडालेली खळबळ बरेच दिवस शांत झालेली नव्हती. जळगाव महानगरासह जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात प्रभावी असणार्या या समाजघटकाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही उघड भूमिका वादाच्या भोवर्यात सापडली आहे. यावरून वाद-प्रतिवाद झडले आहेत. यामुळे महानगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडीत जातीचा मुद्दा नक्कीच डोकावणार असून अर्थातच श्रेष्ठींसाठी ती डोकेदुखी ठरू शकते.
सर्व आघाड्यांवर शांतता
जिल्हा राष्ट्रवादीचे मुख्य संघटनच नव्हे तर विविध आघाड्यांमध्येही शांतता दिसून येत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे विविध क्षेत्रांसह जातीय व धार्मिक समुदायांवर झालेला अन्याय समोर दिसत असतांना राष्ट्रवादीच्या कोणत्याही आघाडीतर्फे याचा तीव्र निषेध झालेला नाही. सत्ता असतांना पक्षाचे आमदार तथा महत्वाच्या पदाधिकार्यांनी जिल्हा कार्यालयात येऊन संघटनाला वेळ द्यावा अशा सूचना राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी अनेकदा दिल्या. हे होत नसल्यामुळे स्वत: शरदराव पवार यांनी जाहीर कानपिचक्यादेखील दिल्या असल्या तरी याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसून आलेले नाही.
नेत्यांची सेटलमेंट; कार्यकर्ते वार्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसला गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फारसे यश लाभले नसले तरी ही भर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भरून काढण्याची नामी संधी होती. मात्र आपल्या निवडणुका जोरदारपणे लढविणारे नेते कार्यकर्त्यांना मात्र पाठबळ देण्यात मागेपुढे करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यामुळे नगरपालिका, झेडपी आणि पंचायत समितीमध्ये पक्षाची अत्यंत सुमार कामगिरी झाली. तर दुसरीकडे नेत्यांनी अनेकदा सोयीची भूमिका घेतल्याची बाबही जिल्हावासियांनी पाहिली आहे. यामुळे रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता हा पक्षाची दुरवस्था पाहून अस्वस्थ झाला असला तरी नेत्यांना मात्र याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
सारेच गोड नको !
राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांचे एकत्रीत परिश्रम हवेत. खरं तर केंद्र व राज्य सरकारविरूध्द असणारा रोष पाहता याचा आगामी निवडणुकीत कसा फायदा होईल ? याकडे जिल्हा कार्यकारिणीने लक्ष द्यायला हवे. दलीत आणि मुस्लीम समुदायांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न हवेत. मात्र यासाठी पक्षाला वाहून घेणारे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हवेत. यासाठी काही कटू निर्णय घेण्याची तयारीदेखील हवी. खुद्द अजितदादा पवार हे कटू निर्णय घेण्यासाठी ख्यात आहेत. यामुळे गुळमुळीत भूमिका न घेता त्यांनी कठोर निर्णय घेत काम करणार्यांना कार्यकारिणीत संधी देण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. जिल्हा राष्ट्रवादीच्या व्याधीवर आता औषधी वा गोळ्यांनी उपयोग होणार नसून शस्त्रक्रिया आवश्यक असल्याची बाब पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा कितीही प्रयत्न केले तरी नेत्यांमधील गटबाजी व संधीसाधूपणाने आगामी काळातही पक्षाचा घात होत राहील.