भुसावळ हत्याकांड प्रकरण ; मयत सुमीतच्या डोक्यात मेंदूत गेलेली बंदुकीची गोळी काढली ; इतरांच्या शरीरातील गोळ्या तपासण्यासाठी मृतदेहांचे केले सीटीस्कॅन
जळगाव : भुसावळ शहरात रविवारी रात्री गोळीबार व प्राणघातक भुसावळचे भाजप नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबुराव खरात, भाऊ सुनील, मुलगा सागर, रोहीत व सुमीत गजरे या पाचही जणांचा मृत्यू झाला. या सर्वांच्या मृतदेहाचे सोमवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात सीटीस्ॅन करण्यात आले. कोणाच्या शरीरात किती गोळ्या आहेत व जखमा कशा आहेत याची तपासणी करण्यासाठी हे सीटीस्कॅन आले. सिटिस्कॅननंतर तब्बल 6 तास शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात ेदण्यात आले. शवविच्छेदनादरम्यान मयत सुमित गजरे याच्या डोक्यात मेंदूत अडकलेली बंदुकीची गोळी काढण्यात आली असून याबाबतचा वैद्यकीय अहवाल वैद्यकीय
अधिकार्यांनी पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
संशयितांना रातोरात चोपड्याला हलविले
राज उर्फ मोहसीन असगर खान, मयुरेश सुरवाडे व शेखर हिरालाल मोघे या तिघा हत्याकांडातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच अटक केली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून संशयितांना रात्री दोन वाजता भुसावळातून चोपडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. निरीक्षक बापू रोहोम व त्यांचे पथक या संशयितांच्या सोबतच होते. रुग्णालयात वैद्यकिय तपासणी झाल्यानंतर रात्रभर या संशयितांची चोपडा शहर पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यानंतर या तिघांना सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणीसाठी आणण्यात आले.
जिल्हा रुग्णालयतही गोपनीय पध्दतीने वैद्यकीय तपासणी
या हत्याकांडातील पाचही मृतदेह जिल्हा रुग्णालयात असल्याने त्यांचे नातेवाईक रुग्णालयात होते. व याच ठिकाणी संशयितांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करावयाची होती. कुठलाही गैरप्रकार होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून मयताच्या नातेवाईकांना कुठलीही कानोकान खबर न लागू देता जिल्हा रुग्णालयाच्या मागील दरवाजाने या तिघांना आपत्कालिन कक्षात आणण्यात आले. यावेळी बंदोबस्त तैनात होता. तपासणी होईपर्यंत कोणत्याच रुग्णाला किंवा नातेवाईकाला आतमध्ये सोडले जात नव्हते. तपासणी झाल्यानंतर पुन्हा या तिघांना मागील दरवाजानेच बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथेही निरीक्षक बापू रोहोम, विजयसिंग पाटील, रामकृष्ण पाटील व शरद भालेराव यांनी तिघांची वेगवेगळी चौकशी केली व त्यांचे जबाब नोंदवून घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरु होती.
चार वैद्यकीय अधिकार्यांकडून सहा तास शवविच्छेदन
हत्यांकाडात मयत झालेल्या पाचही मयतांवर शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. निलेश देवराज, डॉ. सचिन अहिर, डॉ. वैभव सोनार, डॉ. माधुरी रोहेरा. या डॉक्टरांच्या टीमने शवविच्छेदन केले. शवविच्छेदनापूर्वी सीटीस्कॅन करण्यात आले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत चाललेल्या शवविच्छेदनांनतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तीन वेगवेगळ्या रुग्णवाहिकांमधून मृतदेह भुसावळ येथे नेण्यात आले.
हम्प्या जीवंत राहिला तर कोणालाच सोडणार नाही…
गुन्ह्यात अटक केलेल्या तिघांनी पोलिसांना तपासात दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील राज उर्फ मोहसीन अजगर खान, मयुरेश सुरवाडे व शेखर हिरालाल मोघे हे तिघं जण एकाच दुचाकीने रविवारी रात्री हम्प्याच्या घराकडून जात असताना त्याचा मुलगा सागर याने तिघांना धमकावले. यानंतर सागर व तिघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत सागर याने तिघांवर गावठी पिस्तुल रोखले, हेच पिस्तूल राज याने ने हिसकावून उलट सागरवर गोळीबार केला. यानंतर धावून आलेल्या सागरचा भाऊ रोहीतवरही गोळीबार केला.
दोघं भाऊ जागेवरच ठार झाल्याने हम्प्या आता आपल्याला आणि कुटुंबाला सोडणार नाही असे म्हणत तिघांनी हम्प्याचाच गेम करण्याचा निर्धार करुन तिघं घराच्या दिशेने गेले. बाहेर खुर्चीवर बसलेल्या हम्प्यावर गोळीबार केला. घरात पळत असताना त्याला घरातून बाहेर काढून चॉपरने भोसकले. त्यानंतर भाऊ सुनील व सुमीत गजरे यांच्यावर तिघांनी हल्ला केला. त्याशिवाय सागर याने गेल्या वर्षी एकाच्या नात्यातील महिलेशी गैरवर्तन केले होते, तेव्हापासून सागर हा डोक्यात होताच, त्यात नेहमीच्याच त्रासाला कंटाळल्याने त्यातून सुटका म्हणून हा गेम खेळला गेला.