जळगाव (किशोर पाटील)- जिल्हा रुग्णालय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यापासून जिल्हा शल्यचिकित्सक व अधिष्ठाता यांच्यातील समन्वय आणि अधिकारांबाबत अनेकदा चर्चा झाली. अधिकारावरून जिल्हा रुग्णालय विरुद्ध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असा सामना आजतागायत रंगलेला आहे. यात जिल्ह्याची आरोग्य यंत्रणाच भरडली गेली. याचा संबंध जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या, सर्वाधिक मृत्यूदर व रुग्णांची हेळसांड यांच्याशी तपासून पाहणे आवश्यक आहे. वरवर दिसत असलेल्या अनेक गोष्टींची सखोल व पारदर्शकपणे चौकशी होणे गरजेचे आहे.
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्यानंतर १ जुलै २०१७ रोजी नेत्ररोग चिकित्सक असलेल्या डॉ. भास्कर खैरे यांची प्राध्यापक म्हणून वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती झाली. नवीनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्याने या ठिकाणी स्टाफ, डॉक्टर्स दुसरा कोणीही या ठिकाणी यायला तयार नव्हता. साहजिकच अधिष्ठाता पदाची नियुक्ती रखडली. त्यामुळे आजतागायत हे पद रिक्तच होते. मात्र केवळ अधिष्ठाता नसल्याने शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात गैरसोय होऊ नये म्हणून डॉ. खैरे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा पदभार सोपविण्यात आला. दरम्यानच्या काळात जिल्हा शल्यचिकित्सक पदी नवीन चेहराही जिल्हाला मिळाला होता. जिल्हा रुग्णालयात सर्व अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे होते तेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यानंतर तेच अधिकार अधिष्ठातांकडे गेले व यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक हे पद फक्त नामधारी उरले. कानामागुन आली आणि तिखट झाली या मानसिकतेतूनच कारभारात इमारत जरी एकच असली तरी जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे दोन गट कारभारात पडले. त्याचे परिणाम जळगाव जिल्ह्याला भोगावे लागत आहेत. अशातच कोव्हीड रुग्णालयाचे नवीन आव्हान समोर आले. कोरोनासाठी तज्ञ डॉक्टर नसल्याने डॉ. खैरे यांनी वरिष्ठ स्तरावर मागणी केली अधिक मात्र थेट त्यांच्या निलंबनानंतरच डॉक्टरचा स्टाफ कोव्हिड रुग्णालयाला मिळाला. आता कोरोना बाधितांची संख्या वाढणे कोरोनाबाधितांचा मृत्युदर वाढणे, तो कसा वाढला? हा संशोधनाचा विषय आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. यात काही प्रश्न उपस्थित करणार्या गोष्टी घडल्या आहेत, त्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल.
नंबर १ – दुसर्या राज्यात पळालेला संशयित असो की, अल्पवयीन मुलगी अवघ्या काही तासातच पोलिस शोधुन आणतात. याच तत्पर तसेच सतर्क पोलीस यंत्रणेला तब्बल सात दिवस उलटूनही बेपत्ता वृद्ध सापडली नाही. हे विशेष ….गुन्हा घडला त्या ठिकाणावुन तपास करणे ही तपासातील पोलिसांची अगदी प्राथमिक गोष्ट. मात्र बेपत्ता वृद्ध महिलेचा शोध लागल्यावर दुसर्या दिवशी पोलीस वार्ड क्रमांक ७ ला भेट देतात.
नंबर २ – पोलीस शोध घेवु न शकणार्या वृध्द महिलेबाबत सात दिवसानंतर रुग्णालयातील सक्षम अधिकार्यास व सफाई कर्मचार्यासच कशी माहिती मिळते? पाच दिवस कुणालाच कळत नाही कोणीही त्या ठिकाणाकडे फिरकत नाही आणि मृतदेह कुजल्यावर दुर्गंधी सुटल्यावर संबंधित अधिकारी साफसफाई कर्मचारी पोहचतात व प्रकार समोर येतो. जे घडले त्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा, एसआयटी तपास करतील. ते कसे घडले? का घडले? याची कारणे शोधले जातील. मात्र हे कोणी व का घडवून तर आणले नाही ना? याचाही तपास आरोग्य यंत्रणेसह सतर्क पोलीस यंत्रणेने करावा त्यानंतरच दूध का दूध और पानी का पानी समोर येईल.