जिल्हा रूग्णालयातून मोटारसायकल लंपास

0

जळगाव : जिल्हा सामान्य रूग्णालयात आपल्या ओळखीच्या रूग्णाला भेटण्यासाठी आलेल्या एका केटर्स व्यासायिकाची पंचवीस हजार रुपये किंमतीची मोटारसायकल पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने गुरूवारी 8 डिसेंबर रोजी सायंकाळी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी केटर्स व्यावसायिकाने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नातेवाईकाला आले होते भेटण्यासाठी
ओमप्रकाश सुकाराम प्रजापत हे गणेशवाडी येथे राहतात. त्यांचे भजे गल्लीत दयालु केटर्स नावाचे दुकान आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रजापत यांचे ओळखीचे अ‍ॅडमिट होते. त्यामुळे गुरूवारी 8 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रजापत हे मित्र गुलाबसिंग हरिसिंग रोठोड यांच्यासह मोटारसायकल (एमएच.19 ए.टी.9312) ने जिल्हा रूग्णालयात नातेवाईक असलेल्या रूग्णास भेटण्यासाठी आले होते. रूग्णाची भेट घेतल्यानंतर पार्किंगमध्ये आल्यानंतर त्यांना त्यांची मोटारसायकल दिसून आली नाही. आजू-बाजूच्या परिसरात शोध घेतला असता मोटारसायकल आढळून आली नाही. या प्रकरणी बुधवारी 14 डिसेंबर रोजी ओमप्रकाश प्रजापत यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.