जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांसह ग्रामस्थांची गर्दी

0

जळगाव । निंभोरा-पिंप्रीसेकम ग्रामपंचायतीचे सरपंच शालिक सोनू सोनवणे (वय 61) यांची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान, सरपंचाचा मृतदेह सकाळीच जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याने रूग्णालयात नातेवाईकांसह ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये यासाठी रूग्णालयात पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता.

मृतदेह धुळे येथे रवाना…
शालिक सोनवणे हे 15 जुनपासून घरातून बेपत्ता झाले होते. परंतू सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फेकरी उड्डाणपुलावरील एका खांब्याजवळ त्यांचा मृतदेहच मिळून आला. दरम्यान, सोनवणे यांचा दगडाने ठेचून खून झाल्याचे काही वेळताच निष्पन्न झाले. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यानंतर त्यांनी आरोपींना अटक करावी अशी मागणी करत रास्तारोको केला. यानंतर सोनवणे यांचा मृतदेह सकाळीच रूग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. जिल्हा रूग्णालयात मृतदेह दाखल झाल्यानंतर सोनवणे यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली. मृतदेह रूग्णालयात येताच डिवायएसपी सचिन सांगळे यांनी त्या ठिकाणी धाव घेत घटनेची माहिती घेतली. यानंतर कोणताही गोंधळ होवू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवून नये यासाठी रूग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त देण्यात आला होता. दरम्यान, रूग्णालयात देखील नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी आरोपींटा अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. दरम्यान, मृतदेह धुळे येथे रवाना करण्यात आला.