जिल्हा रूग्णालय पडले ‘आजारी’; ‘बुस्टर’ देण्याची गरज

0

सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षा वार्‍यावर

सांगवी : सांगवी परिसरातील जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक ठिकाणचे नागरिक येत असतात. पुणे जिल्हा, शहर, छोट्या गावांमधून येणारे रूग्णांना उत्तम सेवा दिली जाते. मात्र त्यांचे कुटुंबियांना अनेक सुविधा उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी रूग्णांच्या नातेवाईकांकडून ऐकण्यास मिळत आहेत. रूग्णालय उत्तम आहे. रूग्णाची छान काळजी घेतली जाते. मात्र कुटुंबियांसाठी अजिबात काही सुविधा उपलब्ध नाहीत. रुग्णालय परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. परिसरामध्ये साफ-सफाई ठेवली जात नाही, परिसरातील दिवे गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहेत. चोरीमारीच्या घटना वाढलेल्या असतानाही सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. उपाहारगृहाची सोय नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला बुस्टर डोस देण्याची गरज आहे.

वॉर्डमध्ये मांजरांचा मुक्त संचार
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा नाही. साफसफाईचा अभाव, परिसरातील बंद दिवे, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बंद, कँटीन नाही, अपुरे मनुष्यबळ आदी अत्यावश्यक बाबींच्या अभावामुळे रुग्ण, नातेवाईक व कर्मचारी यांचे हाल होत आहेत. पुणे जिल्ह्यासह, राज्याच्या विविध भागातून नागरिक येथे उपचारासाठी येत असतात. मात्र, रुग्णसंख्येच्या मानाने कर्मचारी वर्ग कमी आहे. त्यामुळे अनेक कामे रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत असतात. लॅबमध्ये रक्तासह विविध तपासणीचे रिपोर्ट शोधणे, विविध तपासणीसाठी रुग्णाला स्ट्रेचरवर घेऊन जाणे आदी कामे नातेवाईक करत असल्याचे चित्र आहे. तर शौचालय व बाथरूमची दिवसातून तीनदा स्वच्छता करण्याचे फलक रुग्णालयात लावले असतानाही शौचालयात दुर्गंधी असते. खिडकीचे पडदेही मळकट झाले असून, त्यांच्या ताराही तुटल्या आहेत. वॉर्डमध्ये मांजरांचा मुक्त संचार असतो. परिसरातील दिवे बंद असून, रात्री पूर्ण अंधार पसरलेला असतो.

कॅमेरे पाच वर्षांपासून बंद
लिफ्टचे आठ महिन्यांपूर्वी सर्व साहित्य पडून असून, त्याची जोडणी केलेली नसल्याने लिफ्टचे काम रखडले आहे. त्यामुळे दुसर्‍या लिफ्टवर ताण येतो. ओपीडीसाठी दररोज मोठी रांग लावलेली असते. मात्र, रुग्णांना बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा नसल्याने त्यांना बराच वेळ रांगेत थांबावे लागते. तसेच रुग्णालयातील अनेक कर्मचार्‍यांना आयडी कार्ड व गणवेशही नसतो, तर अनेक कर्मचारी हजेरी लावून बाहेर पसार होत असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. रुग्णालयात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुमारे पाच वर्षांपासून बंद असून, या कॅमेर्‍यांची देखभालच झाली नसल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

25 टक्के कर्मचारी सुट्टीवर
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात स्वच्छता केली जाते. काही कर्मचारी नियमांचे पालन करीत नाहीत. आयडी व गणवेश न घालणार्‍या कर्मचार्‍यांना सूचना करणार आहोत. महिन्याला सुमारे 25 टक्के कर्मचारी सुट्टीवर असतात. त्यामुळे इतर कर्मचार्‍यांवर ताण पडतो. सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग लवकरच सुरू केले जाईल.