जिल्हा रोगमुक्त करणार : विश्वास देवकाते

0

सासवड । संपूर्ण पुणे जिल्ह्यात आरोग्य शिबिरे आणि महाआरोग्य शिबीर आयोजित करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेने नियोजन केले असून कोणत्याही प्रकारचा रुग्ण असो, त्यावर केवळ तात्पुरते औषध उपचार करून सोडणार नसून आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया ही मोफत केली जाणार आहे. जिल्ह्यात एकही रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहता कामा नये. जिल्हा रोगमुक्त केला जाईल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि पुरंदर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा ग्राम आरोग्य संजीवनी कार्यक्रमअंतर्गत मोफत महाआरोग्य मेळावा व सर्वरोग निदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सासवड येथील जयदीप मंगल कार्यालयामध्ये देवकाते यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिबिरात 1922 जणांची तपासणी करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, बबूंसाहेब माहूरकर, जिल्हा बँकेचे संचालक प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी सभापती गौरी कुंजीर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, गटविकास अधिकारी डॉ. सचिन काळे याप्रसंगी उपस्थित होते.

रुग्ण कोणताही असो, त्याच्याकडे त्याची कागदपत्रे उपलब्ध असो अथवा नसो, प्रथम उपचार आणि नंतर इतर गोष्टी केल्या जातील, असे देवकाते यांनी स्पष्ट केले. दरम्यान बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यामधे आतापर्यंत घेण्यात आलेल्या शिबिरांची माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण यांनी केले.