‘कोरोनाशी दोन हात‘ करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाबंदीचे आदेश जारी : आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर होणार कठोर कारवाई
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून कलम 144 अन्वये पाच पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र न जमण्याचे आदेश असून अत्यावश्याक सुविधा सोडून इतर दुकाने 31 मार्च पर्यंत बंदचे आदेश दिले आहेत. या शासकीय आदेशाची अवहेलना करुन दुकाने सुरुच ठेवणार्या एमआयडीसी परिसरातील सात दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात फुटवेअर, कटींगचे दुकाने, आईसक्रिम पार्लर, इलेक्ट्रीक वर्क गॅरेज, पानटपरी, व अंडापावच्या गाडीचा समावेश आहे. रविवारी जनता कर्न्फूनंतर सोमवारी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा बंदी आदेश जारी कोणत्याही प्रकारची वाहतूक करणारी वाहने यांना जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यात संचारबंदीचे आदेशही जारी केले आहे. मात्र उशीरापर्यंत जिल्हाप्रशासनाकडे याबाबत कुठलेही लेखी आदेश नव्हते. तरीही प्रसारमाध्यमांवर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या संचारबंदीनुसार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येणार आहे.
एमआयडीसी परिसरात दुकानदारांवर गुन्हे
जिल्हाधिकारी यांचे बंदीचे आदेश असतांना एमआयडीसी परिसरात सोमवारी काही दुकाने सुरु होती. यात हनीफ ईस्माईल खाटीक वय 50 रा. गुलाबबाबा कॉलनी यांचे तांबापुरा परिसरातील बॉम्बे फुट वेअर, रामभाऊ झिपरु जगताप वय 63 रा. मोहननगर, मोहाडी रोड यांचे सिंधी कॉलनी भागातील साई मेन्सपार्लर, भुषण ज्ञानदेव सरादेे वय 35 रा. का.ऊ.कोल्हे शाळेजवळ यांच्या प्रभुज्ञ आईसक्रिम पार्लर, अबु बकर नशीर खान वय 45 रा. भवानी पेठ यांचे अजिंठा चौफुली येथील युनीक ऑटो इलेक्ट्रीक वर्क हे गॅरेज , राजू रंगनाथ सुर्यवंशी वय 30 रा. सम्राट कॉलनी यांचे आम्रपाली सलून दुकान, देवेंद्रसिंग दिलीप पाटील वय 22 रा.रामेश्वर कॉलनी यांचे पानटपरी, संदीप बाबुराव देशमुख वय 28 रा. कांचननगर यांचे का.ऊ.कोल्हे शाळेजवळील अंडापावची गाडी यांच्यावर शासकीय आदेशाचे उल्लंघन याप्रमाणे कारवाई करण्यात आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, गोविंदा पाटील, इम्रानअली, सय्यद सचिन पाटील, योगेश बारी, सचिन चौधरी, मुकेश पाटील, भुषण सोनार यांनी ही कारवाई केली.
सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवावा
‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून युध्द पातळीवर काम करणे आवश्यक आहे, तसेच संबंधित यंत्रणांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व विभागांच्या विभागीय आयुक्तांकडून त्यांच्या विभागातील ‘कोरोना’ विषाणू संदर्भातील माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, पोलीस उप अधिक्षक नीलभ रोहण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अघिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, महानगरपालिकेचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते आदी उपस्थित होते.
तीन ठिकाणी उभारणार आपत्कालीन वॉर्ड
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले, ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. कोरोना विषाणूमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अत्याधुनिक सुविधा असलेल्या वॉर्डसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जैन हिल्स आदी संस्थांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलास 500 वाहने
शहरासह जिल्ह्यात पोलिस दलाकडे वाहने कमी असल्याने त्यांना गस्त घालण्यास अडचणी येतात. कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पन्नास वाहने जिल्हा पोलिस दलास देवू केले आहे. महापालिका प्रशासनाला जिल्हा प्रशासन वाहने देणार आहे. जेणे करून कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जेवढ्या उपाय योजना करतील तेवढ्या अधिक करण्यावर भर असेल.
हॉटेल चालकांना फक्त घरपोच देण्याची सुविधा
जळगाव शहर किंवा जिल्ह्यातील अन्य शहरात नोकरी, उद्योग, व्यापार, शिक्षण आदी कारणांमुळे अनेक व्यक्ती आपल्या गावापासून तसेच कुटुंबापासून वास्तव्यात आहेत, अशा नागरिकांची जेवणाची गैरसोय टाळण्यासाठी हॉटेल मालक, चालकांना हॉटेल सूरू न ठेवता फक्त गरजू ग्राहकांसाठी घरपोहोच (होम डिलेवरी) सेवा सुरू ठेवावी. होम डिलेवरी सेवा सुरू ठेवताना हॉटेल चालकांनी सर्व्हिस काऊंटर सुरू राहणार नाही. याची विशेष दक्षता पाळणे आवश्यक आहे. हॉटेलात कोणीही ग्राहक प्रत्यक्ष जेवण करण्यासाठी किंवा जेवण घेवून जाण्यासाठी येता कामा नये. याचे उलंलघन झाल्यास हॉटेल चालक, मालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला आहे.
असे आहेत जिल्हा बंदी आदेश
कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याने कोरोना विषाणुच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 च्या तरतुदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची वाहतूक करणारी वाहने यांना जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. फौजदारी प्रक्रीया 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यातील सर्व सिमा तात्काळ बंद करण्यात बंद करण्यात येत आहे. पोलीस अधिक्षक जळगाव व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी संयुक्तरित्या जिल्हातील सर्व सिमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करून त्यांना प्रवेश व निर्गमन करण्यास प्रतिबंध करावा. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही नागरिकास जिल्ह्याबाहेर जाण्यास किंवा बाहेरिल जिल्ह्यतील नागरिकास जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे. जिल्हा बंदी आदेशातून शासकीय, निमशासकीय, म्ब्युलन्स, अग्निशमन वाहने, अत्यावश्यक व जिवनावश्यक वस्तू, सेवा, मनुष्यबळ, पुरविणारी वाहने व वाहतूक व्यवस्था, उदा. पिण्याचे पाणी, दुध, फळे, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे, टेलीफोन व इंटरनेटची सेवा, हॉस्पिटलसाठी आवश्यक असणारे साधन सामुग्री, प्रसार माध्यमांची वाहने, विद्युत विभागाशी संबंधित उपकरणे, पेट्रोल, गॅस, डिसेल इत्यादिंना या बंदी आदेशातून वगळण्यात आलेले आहे.
शिवभोजन केंद्रांनी थाळी पॅक करून द्यावीत
जिल्ह्यात शिवभोजन केंद्रांनी जिल्हा रुग्णालयात किंवा गरजूंना शिवभोजनाची थाळी पॅक करून देण्याच्या सूचना केंद्र चालकांना केल्या आहेत. मात्र एका ठिकाणी जेवण देवू नये. भोजन पॅक करून दिले तर संबंधित व्यक्ती स्वतंत्रपणे एकटे जेवण घेईल. अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत.
…तर यांच्यावर होणार गुन्हे दाखल होणार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सुविधांचा समावेश असलेली दुकाने सोडून इतर दुकाने बंदचे आदेश आहेत. असे असतांनाही सोमवारी अनेकांकडून आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. मात्र पोलीस दलाकडून वेळीच वाहने फिरवून स्पीकरच्या माध्यमातून दुकाने बंद करण्याच्या सुचना करण्यात आल्या. 31 मार्च दुकाने बंदचे आदेश आहेत. पोलिसांमार्फत सुचना देण्यात येणार असून अत्यावश्याक सुविधांव्यतिरिक्त् दुकाने सुरु ठेवणार्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच पाच जण एकत्र जमलेले दिसून आल्यास त्याच्यावरही तातडीने गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पत्रकार, माध्यम प्रतिनिधी, डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, किराणा दुकानदार, दुध डेअरी, या व्यतिरिक्त इतर अत्यावश्यक सुविधा सोडून बाहेर फिरणार्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिले.
किराणा दुकान हे अत्यावश्यक सेवा असून 31 मार्चपर्यंत कुठलेही किराणा दुकान बंद राहणार नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी किराणा दुकानांवरही गर्दी करु नये व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.