नंदुरबार । एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, पर्यवेक्षण व संनियंत्रण, उपलब्ध निधीची तरतुद, उपाययोजना, विचार विनिमय व त्याबाबत कार्यवाही होण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नंदुरबार यांचेवतीने आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार डॉ. हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात झाली.याबैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जे.बी. पठारे, समितीचे अशासकीय सदस्य डॉ. कांतीलाल टाटीया, नारायण सामुद्रे, बळीराम पाडवी, सविता जयस्वाल, शहादा नगरपालिका नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, शहादा, अक्कलकुवा, पंचायत समिती सभापती,व विविध अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
कामांना गती देवून कामे पूर्ण करावी
खासदार डॉ. हिना गावीत बोलतांना म्हणाल्या, विद्युतविभागामार्फत विद्युतीकरण करतांना जिल्ह्यातील सर्व गाव-पाड्यांवर विद्युतीकरण करावे, विद्युतीकरण करतांना तारेऐवजी केबलचा वापर केल्यास वीजचोरीस आळा बसेल. ज्या ठिकाणी ट्रॉन्सफार्मरची आवश्यकता आहे त्याठिकाणी त्वरीत ट्रॉन्सफार्मर बसविण्याची कार्यवाही करावी. पावसाळ्यात रस्त्यांअभावी वाड्या-पाड्याचा संपर्क तुटू नये यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांना गती देवून कामे पूर्ण करावीत. आरोग्याबाबत रुग्णास वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी आरोग्यविभागातील अधिकार्यांची नेहमी सतर्क राहावे. तसेच इतर केंद्र पुरस्कृत योजना जिल्ह्यात राबवितांना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व अंमलबजावणी अधिकारी यांनी समन्वय ठेवून विकास कामे पूर्ण करावीत अशा सूचनाही डॉ. हिना गावीत यांनी यावेळी दिल्या. आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी यावेळी सांगितले विविध अंमलबजावणी यंत्रणांनी दिलेले कामे वेळेत पूर्ण करावीत म्हणजेच आलेला निधी खर्च होईल. विकास कामे तांत्रिक, प्रशासकीय अडचणींमुळे थांबली असल्यास ती जास्त काळ प्रलंबित न ठेवता त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करुन कामे पूर्ण करावीत. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी झालेल्या कामांचे अंदाजपत्रक, कामाचे वर्ष आदि तपशिलासह फलक लावावेत.समिती सदस्य डॉ. कांतीलाल टाटीया यांनी यावेळी दुर्गम भागातील वीज कनेक्शन, विद्युत ट्रान्सफार्मर, प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांची कामे, शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह, आरोग्य, रोहयोची कामे, शिक्षण पोषणआहार आदी विषयांवर माहिती दिली.