जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाला टाकरखेडा गावाच्या दिशेने आज दुपारी मध्यभागीच भगदाड पडल्याने पुलाला धोका

शहादा, ता.१७: जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाला टाकरखेडा गावाच्या दिशेने आज दुपारी मध्यभागीच भगदाड पडल्याने पुलाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाची धावपळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा उशिरा पोहचल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. घटना निदर्शनास येताच टाकरखेडा येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक थांबवली. सारंगखेडा व टाकरखेड्याचा दिशेने पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी व मोटरसायकल स्वारांसाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून बरेजच्या छोट्या पुलावरून तात्पुरती वाहतूक सुरू केली आहे.

पुलावरील कड्डे वेळोवेळी भरण्यात आले असते तर ही दुर्घटना घडली नसती. याला संबंधित विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याची चर्चा आहे.

 

दरम्यान या पुलावरून जाणाऱ्या एस.टी. बसेस आणि अवजड वाहनांना सारंगखेडा पोलिसांनी अनरद बारी येथून शिरपुरकडे तर दोंडाईचा पोलिसांनी नंदुरबारमार्गे वळविली आहे. या पुलावरून वाहतूक बंद झाल्याने सामान्य नागरिकांना धुळ्याकडे किंवा शहाद्याला येण्यासाठी आर्थिक फटका बसणार आहे.

 

सारंगखेडा (ता. शहादा) येथील तापी नदीच्या पुलावरून आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक मोठे अवजड वाहन जात असताना त्या वाहनाचा टायर पुलावरील एका खड्ड्यात रुतल्याने टाकरखेडा गावाचा दिशेने पुलाला मोठे भगदाड पडले. यावेळी सुदैवाने वाहनाला १६ चाके असल्याने वाहन तिथून निघाले. परंतु ग्रामस्थ व नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट येताच पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासन व इतर विभागाला माहिती कळविल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परंतु घटनेला तब्बल दोन तास होऊनही कोणीही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढील अनर्थ टाळण्यासाठी पुलावरील वाहतूक रोखली. दरम्यान, तापी नदीला पूर आल्याने अथांग पाणी वाहत आहे. त्यातच पुलावर भगदाड पडले. पोलिसांना माहिती दिल्यावर देखील पोलीस यंत्रणा तात्काळ पोहचली नाही म्हणून नागरिकांनी रोष व्यक्त केला.

 

*नागरिकांची तारांबळ….

दुपारी साडेचार वाजता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल स्वतः सारंगखेडा पुलाजवळ थांबून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करीत होते. तसेच पुलावर भगदाड पडल्याची माहिती देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. रविवार हा सारंगखेडा येथील आठवडे बाजार असल्याने टाकरखेडा येथील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारासाठी येत असतात. पुलावरून वाहतूक बंद केल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे.

 

*प्रशासनातर्फे सतर्कतेचा सूचना….

हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने तापी दुथडी भरुन वाहत आहे. तापी काठावरील गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून महापूर आल्याने काही गावे पाण्याच्या विळख्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तापी नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढतच आहे. सारंगखेडा व प्रकाशा येथील दोन्ही बॅरेजचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात पूर्णतः गारवा निर्माण झाला असून गत दोन दिवसांपासून सूर्याचे दर्शन नाही.