आदर्श जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करताना आपला जळगाव जिल्हा सुंदर असला पाहिजे. जळगाव जिल्ह्यातील आमदार, खासदार, नगरसेवक किंवा इतर लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागाचे प्रतिनिधित्व न करता संपूर्ण जिल्ह्याचा विकास हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. जिल्ह्याच्या विकासासाठी नवीन उद्योगांची आवश्यकता असून, लोकप्रतिनिधींनी त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. नगरपालिका-महापालिका यांनी देखील आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग शोधले पाहिजे. आज जिल्ह्यातील प्रमुख शहरात रस्ते, गटारी, ड्रेनेज या पायाभूत सुविधांची पूर्तता होणे गरजेचे आहे. मात्र, यापलीकडे कार्यकक्षा विस्तारत जळगावची सुवर्णनगरी, सांस्कृतिक नगरी ही ओळख आणखी गडद करण्याची देखील गरज आहे. त्यासाठी दर्जेदार आणि आशयघन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन झाले पाहिजेत. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा, पार्किंग आणि वाहतुकीची सुविधा, पालिका-महापालिका शाळांचा दर्जा आणि ग्रीन सिटी या संकल्पना अमलात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न झाले तर जळगावकरांचे जीवन अधिक सुसह्य होईल.
कोणत्याही जिल्ह्याची प्रतिमा त्याच्या शहरातील स्वच्छता, चौक सुशोभिकरण आणि आरोग्यविषयक सुविधा यावर आधारलेली असते. बाहेरगावाहून येणार्या पर्यटक, भाविक, प्रवाशांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या तरच जिल्ह्याची प्रतिमा उंचावत असते. जळगाव जिल्ह्याला सामाजिक आणि ऐतिहासिक मोठी परंपरा लाभलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना एक इतिहास आहे. परंतु हा इतिहास आता कालानुरूप पुसट होत चालला आहे. जळगावमध्ये आज नाना-नानी पार्कप्रमाणे इतर मनोरंजनांचे स्थळ निर्माण करणे देखील क्रमप्राप्त झाले आहे. कुटुंबांसोबत वेळ घालवण्यासाठी जळगावासह जिल्ह्यात आज मोजकेच ठिकाण आहेत.त्यामुळे सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत यागोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. जळगावात आज अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयातील सुविधा, खर्च सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचा आहे. रुग्णालयाचा खर्च सामान्य कुटुंबीयांना पेलवत नाही. प्रशासनाने, जिल्हा रुग्णालयात अद्ययावत आरोग्य सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. मोठ्या आजारावर उपचार सुविधा असली पाहिजे. शिवाय मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना माफक दरात आरोग्य सुविधा देणे बंधनकारक केले पाहिजे. जेणे करून नागरिकांना उपचार करीत असतांना मोठा आर्थिक फटका बसणार नाही.याच पद्धतीने खासगी शिक्षण संस्थेतील फी सर्वांनाच परवडणारी नाही. याकरिता पालिका-महापालिका व जिल्हापरिषदच्या शाळा उत्कृष्ट बनल्या पाहिजेत,त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवली पाहिजे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे, त्याचबरोबर ते उत्तम पद्धतीचे असले पाहिजे. यासाठी देखील कडक नियम करण्याची गरज आहे.
शैक्षणिक उपक्रम राबविताना मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न झाले पाहिजे. जिल्ह्यातील अनेक शहरात पाणी वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अनेक शहरात उद्योग, व्यावसायिकांना प्रगती करण्यासाठी मोठी संधी आहे. परंतु नोकरशाही, दप्तर दिरंगाई आणि राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप यामुळे अनेक व्यापार्यांना काम करणे अवघड जाते. सामान्य माणसाची प्रशासकाकडून वारंवार अडवणूक होते.त्यामुळे राजकीय हस्तक्षेप थांबवण्यासाठी देखील प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. पुणे,मुंबईत राजकीय नेते व प्रशासनामध्ये उत्तम सुसंवाद असल्याने तेथील प्रगती जळगावच्या तुलनेत अधिक गतीने होतांना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात वाहनांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षी इथे नवीन हजारो वाहने रस्त्यांवर येतात. त्यामुळे आता पार्किंगची ठिकाणेही अपूर्ण पडत आहेत. वाहतुकीचे नियोजन व पार्किंग ही आता जिल्ह्यातील प्रत्येक शहरासमोरील महत्त्वाची समस्या ठरत आहे. शहरात वाहतुकीची शिस्त कशी आहे यावर देखील शहराची प्रतिमा ठरत असते. यापुढे प्रत्येक वर्षी वाहतूक नियोजनासाठी महापालिका,नगरपालिका यांनी अंदाजपत्रकात तरतूद करण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रत्येक शहरात पार्किंगच्या जागा निश्चित केल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी भाजी मंडई व हॉकर्समुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे वाहतुकीचा ताण अधिक वाढतो. शहराला जोडणार्या प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वाढल्यामुळे कायमच वाहतुकीच्या कोंडीला तोंड द्यावे लागते. हे रस्ते प्रशस्त करण्यासाठी रस्ता रूंदीकरणासाठी विशेष प्रयत्न कारण्याची गरज आहे.
विकासाच्या नावाखाली जिल्ह्यात सिमेंटचे जंगल वाढत आहे. परिणामी शहराच्या तापमानात भर पडत आहे. विकासकामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते. शहरातील झाडे नाहीसे झाल्याने त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. झाडे, फुलझाडांअभावी शहर बकाल बनते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ग्रीन सिटी संकल्पना जोपासली पाहिजे.कचर्याचे व्यवस्थापन शहरातील प्रत्येक घरातून झाले पाहिजे. नवीन बांधकाम परवाना देताना सांडपाणी प्रकल्प उभारणीची सक्ती केल्यास प्रदूषणाचा प्रश्नही कमी होणार आहे. लोकांच्या सहभागातून कचरा उठाव, बगीच्यांची देखभाल या गोष्टी सहज साध्य करता येण्यासारख्या आहेत. त्यादृष्टीने राजकीय तथा सामजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रमोद बर्हाटे
संपादक
दै.साईमत जळगाव मो.9420940921