जिल्ह्याच्या विकासासाठी आमदार, खासदारांचे सहकार्य गरजेचे

0

पुणे । जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व मतभेद बाजुला ठेऊन काम करावे लागेत. आमदार खासदार हे देखील लोकप्रतिनिधीच असतात त्यांच्या सहकार्याशिवाय एकसंध विकास कार्यक्रम राबविणे अशक्य आहे. त्यामुळे सदस्यांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काही पक्षांच्या सदस्यांनी आमदार आणि खासदारांकडून करण्यात येणार्‍या भुमीपुजनाबद्दल आक्षेप घेतला होता. त्यामुळे सभागृहातील तापलेले वातावरण आणि सदस्यांच्या आग्रही भूमिकेमुळे आमदार आणि खासदारांच्या कामकाज हस्तक्षेपाबद्दल ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष नात्याने आणि पक्षाच्या धोरणाप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असून पक्षप्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसारच काम करण्यार असल्याची माहिती देवकाते यांनी दिली.

ग्रामीण विकासाला प्राधान्य द्या
दरम्यान प्रत्येक सदस्याच्या जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी संबधित तालुक्याच्या आमदारांच्या मदतीची आवश्यकता असते. त्यामुळे केवळ भुमिपूजनाचा अट्टाहास न करता ग्रामीण विकासाला प्राधान्य दिल्यास जनतेला दिलेली आश्‍वासने पुर्ण करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद तसेच जिल्हा वार्षिक नियेाजन (डीपीसी) निधीतून आमदार आणि खासदारांच्या हस्ते कामकाजांचे भूमिपूजन करण्यात येते. त्यामुळे त्याविरोधात सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष देवकाते यांनी आमदार व खासदारांशिवाय तसेच त्यांच्या सूचनेशिवाय काम करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषद निधीतून तसेच जिल्हा नियेाजन समितीच्या माध्यामातून ग्रामविकास साधण्यासाठी संबंधित विभागाचा सदस्य कार्यरत असतो. तर तालुका आणि खासदार मतदारसंघासाठी आमदार आणि खासदार प्रयत्नशील असतात. त्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रत्येक आमदाराचा संघर्ष कायम असतो. मात्र, जिल्हा परिषद ठरावामुळे आणि श्रेयवादाच्या लढाईत आमदार आणि खासदारांची पंचायत झाली आहे. त्यासाठी सर्वांनी सबुरीने घेण्याचा सल्ला जाणकार सदस्यांनी एकमेकांना दिला असल्याचे बोलले जात आहे.