सोमवारी होणार्या डीपीडीसी बैठकीत आराखड्यावर चर्चा होणार
जळगाव – जिल्ह्यातील वार्षिक योजना राबविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत 436 कोटी 77 लाख 51 हजार रूपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान दि. 20 रोजी दुपारी 1 वा. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत या आराखड्यावर चर्चा होऊन त्यास मंजूरी दिली जाणार आहे.
राज्यात सत्तांतरानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनांच्या मंजूरीसाठी होणारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक देखिल लांबणीवर पडली होती. मागील आठवड्यातच पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर तातडीने जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेण्याचे आदेश ना. पाटील यांनी दिले. त्यानुसार जिल्हा नियोजन मंडळाची बैठक दि. 20 रोजी दुपारी 1 वा. नियोजन भवनात आयोजीत करण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे राहतील.
दोन महिन्यात निधी खर्चाचे आव्हान
सन 2019-2020 या अर्थिक वर्षात डिसेंबर अखेर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 70.62 टक्के, आदिवासी घटक कार्यक्रम- 71.79, आदिवासी घटक कार्यक्रम (ओटीएसपी) 44.13, अनुसुचित जाती उपयोजना 99.47 असा एकुण डिसेंबर अखेर 72.79 टक्के खर्च झाला आहे. उर्वरीत निधी दोन महिन्यात खर्च करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणांसमोर आहे.
यंदाचा आराखडा 436 कोटींचा
सन 2020-2021 या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा 436 कोटी 77 लाख 51 हजार रूपयांचा आहे. प्रशासकीय यंत्रणांनी 304 कोटीची अतिरीक्त निधीची मागणी केली आहे. दि. 20 रोजी होणार्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत या आराखड्याला पालकमंत्री मंजूरी देणार आहे.
राज्यस्तरीय बैठक 31 रोजी होणार
जिल्हा वार्षिक योजनांचे प्रारूप आराखडे अंतीम करण्यासाठी नाशिक विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 31 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. सकाळी 10 ते 11 नाशिक, स. 11 ते 11.30 वा. नंदुरबार, स. 11.30 ते 12 धुळे आणि जळगाव जिल्ह्याची बैठक दुपारी 12 ते 1 यावेळेत होणार आहे.