पुणे । जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी महिला व बालकल्याण विभागाने 1 कोटी 70 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे आता अंगणवाड्यांचे रूप पालटणार आहे. या निधीतून अंगणवाड्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने सांगितले.सद्य:स्थितीत जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना पुरेशा सुविधाही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यात खासगी शाळांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले असल्यामुळे पालकांचा मुलांना खासगी शाळेत घालण्याकडे ओढा आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला मिळालेल्या निधीपैकी 1 कोटी 70 लाखांचा निधी अंगणवाडी केंद्रांना सुविधा पुरविण्यासाठी दिला आहे़
दर्जा सुधारणार
या निधीतून अंगणवाडी केंद्रांना फॅन, धान्यकोठी, वॉटर फिल्टर, लॅपटॉप, दृकश्राव्य, शैक्षणिक व इतर साहित्य पुरविण्यासाठी हा निधी मंजूर केला आहे़ सर्व अंगणवाड्यांना गरजेनुसार साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे़ त्यामुळे अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असून, चांगल्या दर्जाचे पूर्व प्राथमिक शिक्षण चिमुरड्यांना मिळणार आहे़.
लोकवर्गणीतून उपक्रम
गेल्या दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महिला व बालकल्याण समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्यांमध्ये लोकवर्गणीतून विविध उपक्रम राबविले. तसेच, विविध वस्तूही खरेदी करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यामुळे अनेक अंगणवाड्यांचा दर्जा सुधारला आहे़ आता मात्र जिल्हा परिषदेच्या निधीतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने खर्या अर्थाने अंगणवाड्या ‘हायटेक’ होणार आहेत़