कर्जमाफीनंतरही वंचित राहीलेल्या शेतकर्यांना निर्णयाची अपेक्षा
जळगाव – शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत केवळ जिल्हा बँकेचा विचार केला तर बँकेच्या 3 लाख 71 हजार 976 शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफी झाल्यानंतरही 1 लाख 55 हजार सहा शेतकर्यांकडे 901 कोटी 58 लाख 64 हजारांची थकबाकी आहे. या व्यतिरिक्त इतर राष्ट्रीयकृत बँकेच्या शेतकर्यांकडील कर्जमाफीची रक्कम तितकीच समजली तर, सुमारे दोन हजार कोटींची मदत जिल्ह्याला कर्जमाफी पोटी शासनाकडून मिळाली तर जिल्ह्यातील संपूर्ण शेतकर्यांना कर्जमाफी मिळू शकणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक शेतकरी ‘सन्माना’च्या प्रतिक्षेत आहे.
दोन वर्षापासून तत्कालीन राज्य शासनाने शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. अगोदर संपूर्ण कर्जमाफी, नंतर ठरावीक वर्षातीलच कर्जमाफी, नंतर विविध अटीसह कर्जमाफी, शेवटी दीड लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकर्यांना कर्जमाफी असे नियम लावले गेले. यामुळे अनेक शेतकरी नियमात न बसल्याने ते कर्जमाफीपासून वंचित राहिले. काहींकडे पाच लाखांचे कर्ज असेल तर त्यांना अगोदर साडेतीन लाख रूपये भरावे लागणार होते नंतरच त्यांना दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. यामुळे अनेक शेतकर्यांनी कर्ज न भरण्याकडे कल दिला. नुकतेच राज्यात महाआघाडीचे शासन आले आहे. त्यांचा शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा विचार आहे. जिल्हा बँकेपूरता विचार केल्यास 1 लाख 55 हजार सहा शेतकर्यांकडे 901 कोटीचे कर्जयेणे बाकी आहे.
अशी आहे वंचित शेतकर्यांची आकडेवारी
कर्जमाफी मिळालेले शेतकरी–3 लाख 7 हजार 376, प्रोत्साहनपर लाभ मिळालेले शेतकरी–85 हजार 66, पुनर्गठन केलेले शेतकरी–3 हजार 332, कर्जमाफीची रक्कम–775 कोटी 69 लाख 72 हजार 855, वंचित शेतकरी–1 लाख 55 हजार 6, थकबाकीची रक्कम –901 कोटी 58 लाख 64 हजार