जळगाव । राज्यात शासन प्राधान्याने स्मार्ट सिटी उपक्रम राबवित आहे. त्याच पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामपंचातींना प्रोत्साहित करण्याकरिता 2016 पासुन स्मार्ट ग्रामची योजना सुरू केली आहे. या स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम येणार्या गावांची घोषणा केल्यानंतर त्यांंना प्रत्येकी 10 लाखाचे बक्षीस देण्यात आले आहे. मात्र जिल्हास्तरावर स्मार्ट ग्रामसाठी निवड झालेल्या अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे व पाचोरा तालुक्यातील सारोळा बु. या दोन गावांना संयुक्तपणे पहिले बक्षीस जाहीर झाले असले तरी वर्ष उलटून ही त्यांना 40 लाखाचे बक्षीस मिळाले नसल्याने ही योजना बासनात गेली असल्याचे दिसुन येत आहे. स्मार्ट ग्राममध्ये तालुक्यातुन प्रथम येणार्या ग्रामपंचायतींना 10 लाखाचे पारितोषिक देऊन गौरव केला जातो.
निधी उपलब्ध नाही
जिल्हास्तरावर प्रथम येणार्या ग्रा.पला 40 लाखाचे पारितोषीक दिले जाते. जिल्ह्यातून 15 तालुका स्मार्ट ग्राम म्हणून पात्र ठरलेल्या गावांंना प्रत्येकी 10 लाखाचा निधी शासनाकडून उपलब्ध झाल्याने तो देण्यात आला आहे. मात्र या 15 गावातुन जिल्हा स्मार्ट ग्रामसाठी निवड झालेल्या पिंगळवाडे व सारोळा बु. या ग्रा.पंना विभागुन 20 -20 लाखाचे बक्षीस जाहिर होवून वर्ष उलटले असले तरी निधी उपलब्ध झालेला नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे यांनी सांगितले.