जिल्हाधिकाऱ्यांचे बँक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेच्याअधिकाऱ्यांना आदेश
जळगाव: महाविकास आघाडीने शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंमलात आणली असून या योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील दोन लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकर्यांच्या याद्या तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सोमवारी बँक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेच्या अधिकार्यांना दिले आहेत. त्याअनूषंगाने तातडीने कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या असून 31 जानेवारीपर्यंत अशा शेतकर्यांच्या याद्या तयार करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
याद्यांसाठी जानेवारी अखेरपर्यंत अल्टिमेटम
जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे महिन्याभरापासून आय.ए.एस.अधिकार्यांच्या विशेष प्रशिक्षणाला गेले होते. सोमवारी ते रुजू झाले. शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत त्यांची संबंधित विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. लीड बँकेचे महाव्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, जिल्हा उपनिबंधक विभागाचे सहाय्यक निबंधक गवळी, नीलेश घाठोड, विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील नवीन आलेल्या शासनाने शेतकर्यांच्या कर्जमाफीबाबत जो अध्यादेश काढला आहे. त्याअनुषंगाने ज्या शेतकर्यांनी एक एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत ज्यांनी पिक कर्ज घेतले आहे. ते भरलेले नाही. अशा शेतकर्यांच्या याद्या तयार करण्याबाबत अध्यादेशात म्हटले आहे. 31 जानेवारीपर्यंत अशा शेतकर्यांच्या याद्या तयार करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
दुष्काळी अनुदान वाटपाचा घेतला आढावा
दुष्काळी अनुदान वाटपाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. कर्जमाफीच्या अध्यादेशात युती शासनाने केलेल्या कर्जमाफीचा उल्लेख नाही. यामुळे ज्यांना मागे कर्जमाफी झाली त्यांच्याही याद्या तयार करायच्या का ? जर कर्ज माफ झाले असेल तर त्यांचीही नावे घ्यावयाची किंवा कसे याबाबत अध्यादेशात स्पष्ट सूचना नसल्याने याद्या तयार करताना सहकार, जिल्हा बँकेच्या अधिकारी, कर्मचार्यांचा गोंधळ उडणार आहे. मागील शासनाने काय केले हे गृहीत न धरता नव्याने आलेल्या आदेशाची अंमलबजावणीसाठी सर्वच शेतकर्यांच्या याद्या तयार करण्याचे धोरण अधिकारी, कर्मचार्यांनी स्वीकारले आहे.