सिंधुदुर्ग – नाबार्डच्या वरिष्ठ समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीर्ण झालेल्या ब्रिटीशकालीन विविध पूल व रस्त्यांच्या 47 कोटी 86 लाखांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील धोकादायक सर्व पुलांची कामे घेण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केसरकर बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम आदी उपस्थित होते. या वेळी माहिती देताना केसरकर म्हणाले, “जिल्ह्यात जीर्ण पुलांचा प्रश्न गंभीर आहे. यासाठी जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन जीर्ण पुलांचा सर्व्हे करून नाबार्डच्या वरिष्ठ समितीकडे प्रस्ताव पाठविला होता. या समितीने जिल्ह्यातील विविध पूल व महत्त्वाच्या रस्त्याच्या 47 कोटी 86 लाखांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये तेर्सेबांबर्डे, माडखोल, असरोंडी, हेवाळे, मांडकुली, चराठे-ओटवणे, अणाव घाटचेपेड, कोटकामते आदी पुलांसह तिथवली-खारेपाटण रस्त्या, सातोळी बावडा रस्ता आदींसह आदींसह विविध कामांचा समावेश आहे. या कामांना शासनाकडून निधी प्राप्त होताच जीर्ण पुलांची कामे मार्गी लागतील.