जळगाव- सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च, 2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली आहे.
जागतीक आरोग्य संघटनेने करोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केलेला आहे. तसेच करोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात गतीने पसरत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याने त्याकरीता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जळगांव जिल्हयात करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून “नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी वेळोवेळी आदेश निर्गमित करुन देखील नागरीक रस्त्याने ये-जा करीत आहेत. नागरीकांनी कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये असे वारंवार आदेशित करुनही नागरीक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी करत आहेत, वाहनाने ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.” करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव हे संकट पाहता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, नागरीकांची गर्दी होऊ नये. या पार्श्वभुमीवर जळगांव जिल्हयामध्ये जळगांव शहर महानगरपालिका जळगांव, सर्व नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रामधील व ग्रामिण क्षेत्रामधील दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, अनावश्यकरीत्या फिरणारी इतर वाहने यावर निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. अविनाश ढाकणे यांनी निगर्मित केले आहे.
डॉ. ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, जळगांव शहर महानगरपालिका जळगांव तसेच जळगांव जिल्हयातील सर्व नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्राकरीता दिनांक 24/03/2020 चे दुपारी 15.00 वाजेपासून ते दिनांक 31/03/2020 चे रात्री 12.00 वाजेपावेतो” खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
नागरी भागात मिळणार फक्त अत्यावश्यक सेवानांच पेट्रोल व डिझेल
जळगांव शहर महानगरपालिका जळगांव तसेच जळगांव जिल्हयातील सर्व नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील व या शहरांच्या 3 किलो मीटर परिसरातील सर्व दुचाकी वाहने/ चारचाकी वाहने/ हलके, मध्यम व जड वाहतूकीची वाहने (ऑटो रिक्क्षा वगळून) व अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरणारी इतर वाहने यांना रस्त्यावर ये-जा करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. जळगांव शहर महानगरपालिका जळगांव तसेच जळगांव जिल्हयातील सर्व नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील व या शहरांच्या 3 किलो मीटर परिसरातील सर्व पेट्रोल/डिझेल पंप केवळ सकाळी 7.00 ते सकाळी 10.00 व दुपारी 4.00 ते सायं. 7.00 वाजे पर्यंतच सुरु राहतील. या वेळेत पेट्रोल/डिझेल ची विक्री ही केवळ आणि केवळ सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी,सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयातील कर्तव्यावर असलेली वाहने व संबंधित तत्सम घटक, अत्यावश्यक, जिवनावश्यक वस्तू व सेवा पुरविणा-या संबंधित यंत्रणेची वाहने, सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी/अधिनस्त स्टाफ, सर्व पॅरामेडीकल स्टाफ, सर्व खाजगी डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सेवेशी संबंधित सर्व घटक, प्रसार माध्यमांची वाहने/प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी वापरत असलेली वाहने, वृत्तपत्र विक्रेते तसेच प्रसार माध्यमांच्या वितरणाशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणा. बंदोबस्ताकरीता / ऑन ड्युटी असणा-या गणवेशधारी पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना व त्यांचे वाहनांना पेट्रोल/डिझेलची विक्री करता येईल. तथापि गणवेश परिधान न केलेल्या पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना त्यांचे ओळखपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तसेच जळगांव शहर महानगरपालिका जळगांव तसेच जळगांव जिल्हयातील सर्व नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सर्व अत्यावश्यक माल/वस्तू/सेवा पुरविणारी वाहतूक यंत्रणा, घंटागाड्या, पाणी पुरवठा करणारी वाहने, अन्न, भाजीपाला, फळे, दुध व तत्सम जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी वाहने यांना नमूद वेळेत पेट्रोल/डिझेलची विक्री करणे आवश्यक राहील. तथापि नमूद यंत्रणेकडे ओळखपत्र अथवा परवाना नाही म्हणून त्यांना पेट्रोल/डिझेलची विक्री नाकारण्यात येऊ नये. अशा वेळेस संबंधितांना पेट्रोल/डिझेल विक्री केल्याबाबतची नोंद नाव , पत्ता व मोबाईल क्रमांकासह ठेवणे पेट्रोल/डिझेल पंप चालक/मालक यांना अनिवार्य राहील.
जळगांव जिल्हयातील सर्व लोकसभा/राज्यसभा सदस्य, विधानसभा/विधानपरिषद सदस्य यांचे वाहनांना पेट्रोल /डिझेलची विक्री नमूद वेळेत करता येईल. पेट्रोल/डिझेल पंप मालक चालक यांनी, करोना विषाणू च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने मास्क, सेनिटाईजर्स, फुड पार्सल्स स्वेच्छेने घरपोच सेवा देणा-या NGO यांचे वाहनांना पेट्रोल/डिझेलची विक्री करतांना त्यांना देण्यात आलेले, संबंधित तहसिलदार अथवा स्थानिक पोलीस स्टेशन यांनी निर्गमित केलेल्या पासेसची खात्री करावी व सदर मुळ पास पेट्रोल/डिझेल पंपावर जमा करुन घेण्यात यावा व त्याबाबतची नोंद ठेवावी. पेट्रोल/डिझेल पंपावर पेट्रोल/डिझेल खरेदीसाठी जाणा-या वर नमूद केल्याप्रमाणे सर्व घटक यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. तथापि ओळखपत्र नसल्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये पेट्रोल/डिझेल ची विक्री करता येणार नाही.
ग्रामीण भागात पेट्रोल, डिझेलची विक्री निर्धारीत वेळेत सर्वांसाठी राहणार खुली
जळगांव जिल्हयातील ग्रामिण क्षेत्राकरीता पेट्रोल/डिझेल पंपावर दिनांक 24/03/2020 चे दुपारी 15.00 वाजेपासून ते दिनांक 31/03/2020 चे रात्री 12.00 वाजेपावेतो” पेट्रोल व डिझेलची विक्री करण्यासाठी केवळ सकाळी 7.00 ते सकाळी 10.00 व दुपारी 4.00 ते सायं. 7.00 वाजे पर्यंतची वेळ निर्धारीत करण्यात येत आहे. सदर वेळेत पेट्रोल/डिझेल ची विक्री ही सर्वांसाठीच खुली राहील. उपरोक्त निर्धारीत केलेल्या वेळे व्यतिरीक्त जळगांव जिल्हयातील ग्रामिण भागातील पेट्रोल/डिझेल पंपावरील पेट्रोल/डिझेल बंद राहील. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता राबविण्यात येणा-या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जळगांव जिल्हयातील सर्व ऑटो, दुचाकी, चारचाकी वाहनांचे दुरुस्ती करणारे गॅरेजेस बंद करण्याबाबत या कार्यालयाकडून आदेशित करण्यात आले होते, तथापि अत्यावश्यक/ जिवनावश्यक वस्तू, सेवा, मनुष्यबळ पुरविणा-या सर्व संबंधित यंत्रणा वापरत असलेल्या वाहनांची आवश्यक असेल तेव्हा दुरुस्ती, तत्सम उपाययोजना पुरविणे संबंधित गॅरेज मालक/चालक यांना बंधनकारक राहील.
आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी राहतील नोडल अधिकारी
या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता या कार्यालयाकडून नोडल अधिकारी म्हणून श्री सुनिल दिनकर सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी जळगांव (संपर्क क्रमांक–7083100999, ईमेल-dsojalgaon1@gmail.com) यांची नेमणूक करण्यात येत आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कायद्यातील तरतुदीनुसार होणार कारवाई
या आदेशाचे जळगांव जिल्हयातील पेट्रोल/डिझेल मालक/चालक यांचेकडून काटेकोरपणे पालन केले जाईल याची संपूर्ण जबाबदारी पेट्रोल/डिझेलचे वितरण करणा-या कंपन्यांची राहील. सदर आदेशान्वये निर्धारीत वेळे व्यतिरीक्त व उपरोक्त नमूद केलेप्रमाणे सुट देण्यात आलेल्या वाहनांव्यतिरीक्त अन्य कोणतेही वाहन प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील पेट्रोल/डिझेल पंपावर/ रस्त्यावर आढळून आल्यास संबंधित वाहन चालक/मालकावर पोलीस अधिक्षक जळगांव व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगांव यांनी तात्काळ नमूद कायद्यातील तरतूदीनुसार कारवाई करावी. या आदेशातील सुट देण्यात आलेल्या वाहनांव्यतिरीक्त इतर कोणत्याही वाहनांस सुट द्यावयाची असल्यास याबाबतचे अधिकार संबंधित उपविभागीय दंडाधिकारी, यांना राहतील. या आदेशाचे उल्लंघन कोणत्याही व्यक्ती/ संस्था/संघटना यांनी केल्यास ही बाब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 व भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील. असेही डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगांव यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.