जिल्ह्यातील निष्क्रीय लोकप्रतिनिधींमुळेच रेल्वे प्रवाशांचे हाल

0

दैनिक जनशक्तिच्या ऑनलाईन सर्वेक्षणात प्रवाशांचे मत

जळगाव – दिड महिन्यांपासून देवळाली शटलसह पाच पॅसेंजर गाड्या 23 एप्रिलपर्यंत रद्द असतांना रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या दि.6 ते 19 एप्रिल दरम्यान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल होत असून यास जिल्ह्यातील ‘निष्क्रीय लोकप्रतिनिधी’ कारणीभूत असल्याचे मत दैनिक जनशक्तिने घेतलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात तब्बल 41.3 टक्के प्रवाशांनी नोंदवले आहे तर यास ‘असंवेदनशील रेल्वे प्रशासन’ जबाबदार असल्याचे 38.67 टक्के प्रवाशांचे म्हणणे आहे. 20 टक्के जणांच्या मते यास ‘प्रवाशांमध्ये एकजूटीचा अभाव’ असल्याचे मत नोंदविले.

तिसर्‍या लाईनचे काम व मेन्टेनन्सच्या नावाखाली दोन ते अडीच महिने चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान धावणार्‍या सर्व पॅसेंजरसह एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. रेल्वे प्रवाशांना होणार्‍या त्रासाला वाचा फोडण्यासाठी दैनिक जनशक्तिच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे ’सर्वसामान्यांच्या सोईसाठी असलेल्या पॅसेंजर रेल्वे तब्बल दोन महिने रद्द होण्यास कोण जबाबदार?’ या मथळ्याखाली सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ‘निष्क्रीय लोकप्रतिनिधी’, ‘असंवेदनशील रेल्वे प्रशासन’, ‘रेल्वे प्रवाशांमध्ये एकजूटीचा अभाव’ असे तीन पर्याय देण्यात आले होते. या सर्वेक्षणात वाचकांनी आपले मत नोंदविले असता त्यात प्रवाशांना होणार्या त्रासाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याने दिसून आले. जनशक्तिच्या ऑनलाईन सर्वेक्षणात 3324 प्रवाशांनी आपले मत नोंदविले. त्यात 41.3 टक्के वाचकांनी रेल्वे प्रवाशांना होणार्या त्रासाला लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे मत नोंदविले. तसेच 38.67 टक्के वाचकांनी रेल्वे प्रशासन तर 20 टक्के वाचकांनी प्रवाशांमध्ये एकजूटीचा अभाव असल्याचे मत नोंदविले. उन्हाळी सुट्यांसोबत लग्नसराईच्या हंगामातच रेल्वेने पॅसेंजर गाड्या बंद ठेवल्याने चाकरमान्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. 1 एप्रिलपासून पॅसेंजर सुरू होणार असे प्रशासनातर्फे सांगण्यात येत होते. मात्र पुन्हा 23 एप्रिल पर्यंत रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. याला सर्वस्वी लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचे मत रेल्वे प्रवाशांचे आहे.

वेळेसह आर्थिक भूर्दंड

मुंबई, देवळाली, नागपूर तसेच सकाळी व रात्री सुटणारी सूरत पॅसेंजर या पाच गाड्या 15 फेब्रुवारीपासून मेेंंटेनन्सच्या कामासाठी रेल्वेने रद्द केल्या होत्या. तर 1 एप्रिलपासून या गाड्यांची सेवा पूर्ववत होण्याची अपेक्षा फोल ठरली. तब्बल दोन महिन्यांपासून भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांना या गाड्या सुरू होण्याची अपेक्षा असली तरी गाड्या सुरू होत नसल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनाल होत असून प्रवाशांना एक्सप्रेस गाड्यांसह बसेसने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेसह आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.

मुंबईसह, देवळाली व नागपूर, कटनी पॅसेंजर रद्द

गाडी क्रमांक अप 51154 आणि डाउन 51153 भुसावळ-मुंबई पॅसेंजर 1 ते 23 एप्रिलदरम्यान रद्द करण्यात आली आहे तर गाडी क्रमांक अप 51182 व डाउन 51181 भुसावळ-देवळाली पॅसेंजर 1 ते 23 एप्रिल तसेच गाडी क्रमांक अप 51286 व डाउन 51285 भुसावळ-नागपूर पॅसेंजर 1 ते 23 एप्रिलपर्यंत रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. डाऊन 51187 भुसावळ-कटनी रद्द करण्यात आली आहे. एक्सप्रेसही रद्द पॅसेंजरसोबतच काही एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात 11039/40 महाराष्ट्र एक्सप्रेस ही 6 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यत, 15018/17 काशी एक्सप्रेस 6 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यत, 11025/26 हुतात्मा एक्सप्रेस 5 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आले आहे.

नेते निवडणूकीत गुंग

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी निवडणूकीत गुंग आहे, त्यामुळे प्रवाशांना होणार्‍या मनस्तापाकडे दुर्लक्ष केले जात आहे. निवडणूक आचारसंहिता सुरु असल्याने रेल्वे प्रवाशी आपली गार्‍हाणी कोणाकडे मांडणार हा मोठा प्रश्‍न आहे. मात्र रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांना काही प्रवाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीने भुसावळ डीआरएम यांच्याशी संपर्क साधून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या सुचना दिल्या.