जळगाव:ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 6 लाख 34 हजार 368 शेतकर्यांचे 7 लाख 3 हजार 787 हेक्टरवर नुकसान झाल्याचा अहवाल आज जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनाच्या सचिवांकडे (मदत व पुनर्वसन महसूल व वनविभाग) यांना जिल्हाधिकार्यांनी सादर केला आहे.
गेल्या महिन्यात दिवाळीपूर्वी, दिवाळीत व नंतरही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यात कापूस, ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानीनंतर पंचनाम्याचे आदेश दिल्यावर दिवाळीच्या सुट्या असल्याने पंचनाम्यास विलंब झाला होता. पाच तारखेपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र विविध अडचणींचा सामना करीत आज अखेर पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवाल सचिवांकडे जिल्हाधिकार्यांनी सादर केला. कापसाला बोंड फुटल्यानंतर पाऊस आल्याने कपाशीचे बोंडे जळाली, ज्वारी काळी पडली, मका व अन्य पिके काढून ठेवल्यानंतर अतिवृष्टी झाल्याने त्यावर बुरशी आली आहे. यामुळे कपाशीचा दर्जा खालावला आहे.
मदतीची अपेक्षा
राज्यात सत्तास्थापनेचा खेळ सुरू आहे. शेतकरी वार्यावर असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे. त्यामुळे मदत कुणाकडे मागावी असा प्रश्नच शेतकर्याला पडला आहे. तरी याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून शेतकर्याला उभे करण्यासाठी त्वरीत आर्थिक मदत जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
नुकसानीची आकडेवारी
फळपिक सोडून जिरायती पिकाखालील बाधित क्षेत्र
शेतकरी 4 लाख 90 हजार 889, क्षेत्र – 5 लाख 46 हजार 161.57 हे.
फळपिक सोडून बागायती पिकाखालील बाधित क्षेत्र
शेतकरी 1 लाख 32 हजार 896, क्षेत्र 1 लाख 47 हजार 104.98 हे.
फळपिका खालील बाधित क्षेत्र-
शेतकरी 10 हजार 583, क्षेत्र- 10 हजार 520.67 हे.
एकूण- शेतकरी 6 लाख 34 हजार 368, एकूण क्षेत्र 7 लाख 3 हजार 787