जिल्ह्यातील मानव तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करा

रा.काँ.नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन

नंदुरबार। जिल्ह्यातील मानव तस्करी रोखण्याकरीता आपल्या स्तरावरुन उपाययोजनांसाठी आदेश व्हावेत, अशी मागणी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश भोई यांनी निवेदनाद्वारे केली आहे. अशा आशयाचे निवेदन राज्य महिला आरोगाच्या प्रदेशाध्यक्षा तसेच रा.काँ.च्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना नुकतेच देण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या अभावामुळे ग्रामीण भागातून आदिवासी व कष्टकरी महिलांचे स्थलांतर होत असते. त्यात गुजरात, मध्यप्रदेश, नाशिक, पुणे, मुंबई अशा ठिकाणी प्रवास करत स्थलांतर होत असते. बर्‍याचदा यात महिलांचा तसेच गरोदर महिला व लहान बालकांचा समावेश असतो. त्यांना स्थलांतरीत प्रदेशात योग्य सुविधा नसतात. तसेच त्यांचे लैंगिक शोषण होत असते. पुरेसा कामाचा मोबदला मिळत नसतो. तसेच त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात. लहान बालकांचेही पालन-पोषण योग्यरित्या होत नाही. त्याप्रमाणे कुपोषणाचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत महिलांचे तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यातून शेकडो महिला कधीच परत आलेल्या नाहीत. त्यांचा काहीतरी घातपात झाल्याचे त्यांच्या परिवाराकडून सांगितले जाते. अशा गंभीर समस्येची कोठेही मोजदात किंवा गणना केलेली दिसून येत नाही. त्याकडे महाराष्ट्र शासनाचे व महिला आयोगालाही त्याबद्दल अवगत केले जात नाही. अशा महिलांना व मजुरांना न्याय मिळावा, म्हणून प्रत्येक जिल्ह्यात अधिकृत नोंदणी असणार्‍या संस्थांना व व्यक्तींनाच मजुर नेण्याचे अधिकार किंवा परवाना देण्यात यावेत. किती मजुर आले व गेले? याचा वार्षिक तपशिलवार अहवाल वेळावेळी शासनाने व महिला आयोगाने तपासला पाहिजे. कोणीतरी अज्ञात व्यक्ती महिलांना, पुरुषांना मजुर म्हणून घेवून जाते. त्यामुळे गुन्हेगारी स्वरुपाचे मोठे षडयंत्र यात असल्यावरही प्रशासनाला काहीच करता येत नाही. नोंदणीकृत संस्थांकडे मजुरांची संख्या, पत्ता, वय, त्यांचे आरोग्याचे प्रमाणपत्र तसेच कामाचा कालावधी व कुठल्या कंपनीत, कारखान्यात कामाला जात आहेत, तेथील पत्ता व संबंधित पत्र असणे बंधनकारक असल्याशिवाय मजुरांची ने-आण करता येणार नाही. यासाठी उपाययोजना कराव्यात.

मजुरांना सुखरुपपणे पुन्हा आणण्याची सक्ती असावी
मजुरांना (महिला मजुरांना) लैंगिक शोषण झाल्यास, आर्थिक शोषण झाल्यास दाद मागता येईल. शासनालाही योग्य ती कारवाई करण्यास सोपे जाईल.  नोंदणीकृत संस्था व व्यक्ती यांना जबाबदारीने मजुरांना सुखरुपपणे पुन्हा आणण्याची सक्ती असावी. ज्यामुळे मजुरांची तस्करी, गैरवापर, लैंगिक, आर्थिक शोषण, मानवाधिकारांचे अवमूल्यन होणार नाही, यासाठी आळा बसेल.  अशा निवेदनातील मागणीची गांभीर्यपूर्ण विचार करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचारी संघटना, नंदुरबारतर्फे केली आहे.