जिल्ह्यातील मूजोर पतसंस्था चालकांवर ई.डी.अंतर्गत कारवाईची मागणी

0

जनसंग्रामच्या बैठकीत ठराव ; सावदा-फैजपूरातील ठेवीदारांना धनादेशाचे वाटप

रावेर- जिल्ह्यातील अडचणींच्या पतसंस्थेतील ठेवी ठेवीदारांना परत मिळाव्यात म्हणून जिल्ह्यातील मुजोर पतसंस्थाचालकांवर ‘मनी लॉड्रींग अ‍ॅक्ट’नुसार गुन्हे दाखल करून सहकार विभागाने सक्त वसुली संचालनालयामार्फत ‘सुमोट्यू’ कारवाई करावी, असा ठराव जनसंग्राम बहुजन लोकमंच संलग्न राज्य ठेवीदार समितीच्या सावदा येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. संघटनेच्या ठेवीदारांची बैठक सावदा विश्रामगृहाच्या आवारात रविवारी सकाळी झाली. बैठकीला संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीच्या सुरुवातीला सावदा-फैजपूर नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवींच्या रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले व या संस्थेच्या ठेवीदारांची यादी तयार करण्यात आली.

पतसंस्था चालकांवर कारवाईची मागणी
पतसंस्थेत अपहार केलेल्या अनेक संचालकांवर लेखा परीक्षकांच्या फिर्यादीवरून यापूर्वी विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून काही जण तुरुंगात जावून जामिनावर मुक्त झाल्याने अशांना ठेवी परत करण्याची भीती राहिलेली नाही म्हणून यापूर्वी संस्थेत अपहाराच्या गुन्ह्यांत आरोपी असलेल्या संस्थाचालकांवर ई.डी.अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी ठेवीदारांनी केली. सावदा शहरातील 15-16 पतपेढ्यांमधील ठेवीदारांना ठेवींच्या रकमा तात्काळ मिळाव्या म्हणून येथील पतसंस्थांच्या ठेवीदारांसाठी स्वतंत्र कॅम्प आयोजित करण्यात यावा, अशी सुद्धा मागणी करण्यात आली.

23 रोजी विभागीय सह निबंधकांना साकडे घालणार
सहकार आयुक्तांनी 2017 अखेर ठेवीदार मुक्त जिल्ह्याची घोषणा करत जाहीर केलेला कृती कार्यक्रम व त्यानंतर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात घेतलेल्या आढावा बैठकीतून ठेवीदारांना न्याय मिळालेला नाही. येत्या 23 रोजी पतसंस्थांच्या ठेवी परत करण्याच्या उपाय योजनांसाठी विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव आढावा बैठकीसाठी जळगाव येथे येणार आहेत. त्यांच्याकडे ठेवीदारांना तात्काळ दिलासा मिळावा म्हणून पतसंस्थाचालकांवर सक्त वसुली संचालनालय (ई.डी.) मार्फत कारवाईच्या प्रलंबित प्रस्तावाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करण्यात यावी ,असेबैठकीत ठरले.

यांची होती उपस्थिती
बैठकीचे प्रास्ताविक यशवंत गाजरे यांनी तर आभार मिलिंद तायडे यांनी मानले. बैठकीला विलास फेगडे, यशवंत नेहते, निर्मला धांडे, रजनी पंडित पाटील, शालिनी विलास फेगडे, प्रमिला नेहते, सीताराम इंगळे, गोविंद परदेसी, ज्ञानेश्वर बारी, विलास बेंडाळे, मिलिंद तायडे, तुळशीराम धांडे, पंडित नेमाडे आदी ठेवीदार उपस्थित होते.