शासकीय व निमशासकीय कार्यालयात अनेक पदे रिक्त असल्याचे विस्तृत निवेदन
युवासेनेचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांना मागणीचे निवेदन
धुळे । धुळे जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात अनेक पदे रिक्त असून ती तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी युवासेनेने केली आहे. यासंदर्भात विस्तृत निवेदन अॅड.पंकज गोरे यांनी पालकमंत्री ना.दादाजी भुसे यांना दिले आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांची उपस्थिती होती. निवेदन देतांना युवासेनाधिकारी अॅड.पंकज गोरेंसह संदीप मुळीक, हरीष माळी, अमित खंडेलवाल, मनोज जाधव, आकाश शिंदे, जितेंद्र पाटील, मनिष पाटील, स्वप्निल सोनवणे, भुषण चौधरी, अमोल पटवारी, निलेश चौधरी गोकुळ येलमामे आदी उपस्थित होते.
१६५ सजांवर १६५ तलाठी गरजेचे
धुळे जिल्ह्यात नव्याने १६५ सजांची निर्मिती होत आहे. त्यासाठी किमान १६५ तलाठी भरणे गरजेचे आहे. ही भरती प्रक्रिया तातडीने राबविल्यास शेकडो तरुणांना रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्र सिक्युरिटी पोस्टमध्ये वर्षानुवर्षे करारावर काम करणार्या कर्मचार्यांना कायम केल्यास त्यांना रोजगाराचे शाश्वत साधन उपलब्ध होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता शासनाला वस्तूनिष्ठ अहवाल सादर करुन ही बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात बेरोजगारी जास्त
मनपात मुख्य सचिव, लेखा विभाग, जकात विभाग, वसुली विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभाग, अग्निशमन, पाणी पुरवठा, आरोग्य आदी विभागात तब्बल १९० पदे रिक्त आहेत. धुळे जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा असून अनेक कार्यालयात निवृत्तांना मदतीला घेवून कारभार चालविला जात आहे. तर काही ठिकाणमानधनावर काम भागविले जात आहे.
रिक्त पदे भरविण्यासह केल्या विविध मागण्या
धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात अ,ब,क,ड श्रेणी व शिपाई प्रवर्गातील पदे रिक्त असून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचार्यांना मानधनावर ठेवून सेवा घेतली जात आहे. त्याऐवजी नविन भरती करून युवकांना प्राधान्य देण्यात यावे, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जलद करावी, विन युवा शिक्षकांची भरती करावी, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समधील कर्मचार्यांना कायम करावे, पात्र अधिकारी, कर्मचार्यांना पदोन्नती देवून रिक्त जागेवर नविन भरती व्हावी, चतुर्थ श्रेणी कर्मचार्याला पदोन्नती मिळावी, विभागीय आयुक्तांतर्गत १६ कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत १६ कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत ३६ कार्यालये, जि.प.अंतर्गत २० कार्यालये, मनपाची १० कार्यालये, जलसिंचन विभाग ५ कार्यालय, बांधकाम विभाग ८ कार्यालये यासह राज्य परिवहन, माध्यमिक शिक्षण, जिल्हा न्यायालय, जिल्हा उद्योग, एमआयडीसी आदी ठिकाणची रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे.
जि.प.आरोग्य विभागात १८० पदे रिक्त
धुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागात जवळपास १८० पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागासारखी २० कार्यालय जिल्हा परिषद अंतर्गत असून त्याचा विचार करता हजारो पदे एकट्या या विभागात खाली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागात ८० पदे रिक्त असून १६ विभागांचा विचार करता तेथेही दीड हजाराहून अधिक पदे रिक्त आहे.