निजामपुर। रेशनदुकानदारांच्या महाराष्ट्र राज्यात दोन संघटना असुन त्यापैकी एक संघटना 1ऑगस्ट पासुन संपावर जाणार आहे. पंरतु अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघ पुणे ही संघटना 1 ऑगस्टच्या संपात सहभाग होणार नाही. धुळे जिल्हा संघटना पुणे महासंघाची संलग्न असल्याने संपूर्ण धुळे जिल्हा संघटना संपावर जाणार नाही. सर्व दुकानदारांनी ऑगस्टची मालाची उचल करून माल वाटप करावे व ग्राहकाची गैरसोय टाळावी असे आवाहन संघटनेचे प्रदेश सचिव गुलाब नांदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
18 जुलै रोजी अखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने दिल्ली येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चांत लाखोच्या संख्येने दुकानदार हजर होते. यावेळी दुकानदारांच्या मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले. शासन आपल्या मागण्यांचा नक्की विचार करेल. थोडा वेळ शासनाला द्यायला हवा. पंरतु महाराष्ट्र राज्यातील एका संघटनेने 1 ऑगस्टपासुन संपाचे हत्यार बाहेर काढले आहे. पंरतु आपल्या संघटनेने वेट अँड वॉच हे धोरण अवलंबले असल्यानेे धुळे जिल्हा संपावर जाणार नाही. रेशनदुकानदार व केरोसिन विक्रेते यांनी व्यवहार सुरू ठेवावे असे आवाहन गुलाबराव नांदे यांनी केले आहे.