जळगाव । जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांची सर्वशिक्षा अभियानांतर्गत दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यातील शाळादुरुस्तीसाठी 7 कोटीची आवश्यकता असल्याने उपलब्ध निधी तोकडा ठरत आहे. त्यामुळे पुढील हप्ता प्राप्त होईल तेव्हा जिल्ह्यातील नादुरुस्त शाळा दुरुस्तीचे कामे सुरु करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकुण 96 शाळांची दुरुस्ती होणार आहे. यात स्वच्छतागृहे, पिण्याची पाण्याची व्यवस्था, शाळांसाठी आवश्यक तरदुदी करण्यात येणार आहे. शुक्रवारी 1 रोजी जिल्हा परिषद शिक्षण समितीची बैठक झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिक्षण सभापती पोपट भोळे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्यासह समिती सदस्य, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जामनेर शिक्षणाधिकारीवर कारवाईची मागणी
जामनेर तालुक्यातील सामरोद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची 4 महिन्यापूर्वी सहल गेली होती. सहलीहून परतल्यानंतर मागच्या दिवशी सहा शिक्षक अनधिकृतरित्या कोणाचीही परवानगी न घेता गैरहजर असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र सपकाळे यांना आढळून आले. गटशिक्षणाधिकारी यांनी गैरहजर शिक्षकांवर कारवाई न करता शिक्षकांच्या एकतर्फी आरोपावरुन विस्तार अधिकारी सपकाळे यांना निलंबीत केले. गटशिक्षणाधिकारी यांनी कोणतीही चौकशी न करता निलंबनाची कारवाई केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समिती सदस्य गजेंद्र सोनवणे यांनी बैठकीत केली.
उपक्रमशिल शिक्षकांबाबत अनभिन
शिक्षण समिती सदस्य गजेंद्र सोनवणे यांनी जिल्ह्यात किती उपक्रमशिल शिक्षक आहेत, त्यांचा विषय कोणता, राज्यस्तरावर किती शिक्षकांनी उपक्रमाचे प्रदर्शन केले आहे, उपक्रमशिल शिक्षकांना प्रोत्साहन दिले जाते का? याबाबत माहिती विचारली असता, शिक्षणविभागाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे दिसून आली. यावरुन उपक्रमशिल शिक्षकांबाबत शिक्षणविभाग अनभिन असल्याचे शिक्षण समितीच्या बैठकीत दिसून आले. सोनवणे यांनी चोपडा तालुक्यातील काझीपूरा येथील तीन शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याची तक्रार केली. यावर शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
आनंद डेअरीतर्फे दुध वाटप
गुजरात राज्यातील प्रसिध्द आनंद दुध डेअरी 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्याअनुषंगाने आनंद डेअरीतर्फे जिल्ह्यातील 10 हजार विद्यार्थ्यांना दररोज दोनशे मीली मोफत दुधाचे वाटप करण्यात येणार आहे. सुरुवातीला जळगाव तालुक्यातील शाळांमध्ये दुध वाटप करण्यात येणार आहे, त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात दुध वाटप करण्यात येणार आहे. एनडीडीबीमार्फत जिल्हा दुधसंघाला कळविण्यात आले होते. दुध संघाकडून शिक्षणविभागाला पत्र प्राप्त झाले आहे.
अद्यापही गुन्हाची नोंद नाही
शहरातील स्वस्तिक गोडावूनमध्ये मुदत बाह्य शालेय पोषण आहार आढळून आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शालेय पोषण आहार अधीक्षक यांना सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहे. अद्यापही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. कागदपत्राच्या अभावामुळे गुन्हा नोंदविण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी सर्व कागदपत्र अधीक्षक रवीकिरण बिर्हाडे यांच्याकडे देण्यात आले होते परंतू गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. यावरुन गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ होत असल्याचा मुद्दा शिक्षण समिती सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी बैठकीत मांडला. जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे यांनी माहिती अधिकारातून माहिती मागितल्यानंतर सीईओनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते.