जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ

0

जळगाव – जिल्ह्यातील सुमारे 25000 शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला होता. यापैकी 22000 शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हिस्सा मिळालेला होता परंतु केंद्र सरकारकडील नुकसान भरपाईच्या हिश्याची रक्कम मिळालेली नव्हती. यासाठी रविवारी सुमारे 250 शेतकऱ्यांनी माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे व खासदार रक्षाताई खडसे यांनी भेट घेऊन सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले. खासदार रक्षाताईं खडसे यांनी काल केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानभरपाईची रक्कम लवकरात लवकर मिळावी अशी कडक भूमिका घेतली. याचे फलित म्हणून आज केंद्र सरकारने त्यांच्या हिश्याची नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपन्याना वर्ग केली.

सोमवारपासून शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून केंद्र सरकारच्या हिश्याची नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. तसेच उर्वरित 3000 शेतकरी ज्यांचे बँक खाते क्रमांक बदलले, चुकल्यामुळे नुकसानभरपाई पासून वंचित राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांच्या हिश्याची नुकसानभरपाईची रक्कम विमा कंपन्या बँकेकडे वर्ग करणार आहेत. त्या शेतकऱ्यांना त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर नुकसान भरपाई मिळेल. मागे 14 जून रोजी माजी महसूल कृषी आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या समेवत शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री ना.राधामोहन सिंग यांची भेट घेतली होती व नुकसानभरपाईची मागणी केली होती.