जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे

0

पुणे । पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे जिल्ह्यात 28 जानेवारी आणि 11 मार्च 2018 रोजी पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शून्य ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली.पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या पोलिओ लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पल्स पोलिओ समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यावेळी राव यांनी ही सूचना केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चेतन खाडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

5 लाख बालकांना लस
जिल्ह्यात 28 जानेवारी आणि 11 मार्च 2018 रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील शून्य ते 5 वयोगटातील 5 लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात या वयोगटातील ग्रामीण भागात 4 लाख 32 हजार 46 तर नागरी भागात 81 हजार 147 अशी एकूण 5 लाख 13 हजार 193 बालकांना ही लस देण्यात येणार आहे. त्याकरीता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4 हजार तसेच शहरी भागामध्ये 388 असे एकूण 4 हजार 388 पोलिओ बूथ कार्यान्वित केले जाणार आहेत. तसेच ट्रान्जिट बूथ (चार दिवसांसाठी) 398 तर मोबाईल बूथ (एका दिवसांसाठी) 419 असणार आहेत, अशी माहिती राव यांनी दिली.

घरोघरी पाहणी
ही मोहीम झाल्यानंतर ग्रामीण भागात तसेच शहरी भागात घरी जाऊन लसीकरण केल्याची खात्री केली जाणार आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी दक्षता घेण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. माने यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चेतन खाडे यांनी सादरीकरण केले.

10 कर्मचार्‍यांची नियुक्ती
या बूथसाठी एकूण 10 हजार 887 कर्मचारी तर 879 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, रस्त्यांची कामे करणार्‍या मजुरांची बालके तसेच झोपडपट्टी भागातील बालकांना लसीकरण करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे.