जळगाव। जिल्ह्यातील शाळांना पुरविण्यात येणारा शालेय पोषण आहार धान्य हा निकृष्ट पुरविण्यात येत असल्याचे झेडपी सदस्या पल्लवी सावकारे यांनी तपासणी केली असता आढळून आले. यासंबंधी त्यांनी तक्रार केली होती. शिक्षण विभागाने 3 जुलै रोजी निकृष्ट धान्य शाळेतुन बदलविण्याचे आदेश दिले होते. आदेश देऊनही आठवड्याभरानंतर निकृष्ट धान्य बदलले नसल्याने त्यांनी सीईओ, शिक्षणसभापती यांच्याकडे तक्रार केली. यासंबंधी चौकशी करण्यासाठी सीईओ यांनी समिती नेमुन जिल्ह्यातील सर्व शाळा तपासणीचे आदेश दिले. मंगळवार 11 पासून शाळा तपासणीला सुरुवात झाली आहे.
सदस्यांनी केली तपासणी
मुक्ताईनगर तालुक्यातील झेडपी सदस्या वैशाली तायडे, निलेश पाटील यांनी तालुक्यातील मराठी शाळेला भेट देऊन तेथील पोषण आहार धान्य तपासले. यावेळी केंद्रप्रमुख ठोसर, गटशिक्षणाधिकारी सरोदे, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.
पुरवठादाराचा प्रयत्न फसला
भुसावळ तालुक्यातील वांजोळे येथे माळी नावाच्या पुरवठादार निकृष्ट धान्य बदलविण्यासाठी आला होता. मात्र त्यांनी केवळ मुगदाळ बदलविण्याचे आदेश असल्याचे सांगत मुगदाळ बदलून देण्याची तयारी केली. त्याचवेळी वांजोळे येथील सरपंच यांनी जिल्हा परिषद सदस्या सावकारे यांना संबंधीत बाबत कळविली. सावकारे यांनी मुख्याध्यापकांशी संपर्क साधून डाळ बदलवुन न देण्याचे आदेश दिले. संबंधीत पुरवठादाराला तेथेच थांबवा आम्ही येतो असे सांगितले असता पुरवठादाराने तेथून काढता पाय घेतला. एक डाळ बदलवून संपुर्ण धान्य बदलले असे दाखविण्याच्या प्रयत्नात पुरवठादार होता मात्र त्यांचा प्रयत्न फसला असल्याचे प्रथम दर्शीनी सांगितले.
लेखी घेतले
जिल्ह्यातील 1800 शाळांमध्ये तपासणी सुरु करण्यात आली आहे. तपासणीत निकृष्ट धान्य आठळून आल्यास मुख्याध्यापकांकडून पोषण आहार खाण्यायोग्य नसुन माल बदलुन मिळावा असे लेखी निवेदन घेण्यात येत आहे. भुसावळ तालुक्यातील कुर्हा, वांजोळा येथे जि.प. अधिकारी यांनी तपासणी केली. यात निकृष्ट धान्य आढळून आले.