जिल्ह्यातील साडे सातशे उमेदवारांचे आज ठरणार भविष्य

0

जळगाव । नु कतीच राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दोन टप्पात निवडणुक प्रक्रिया पार पडली. पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी 16 फेबु्रवारी रोजी घेण्यात आले तर दुसर्‍या टप्प्यातील मतदान मंगळवारी 21 फेबु्रवारी रोजी घेण्यात आले. दोन्ही टप्प्यातील निवडणुकीचा आज गुरुवारी 23 रोजी सकाळी 10 वाजेपासुन एकत्रीत मतमोजणी होवून निकाल जाहिर होणार आहे. जिल्ह्यातील 754 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 67 गटासाठी आणि पंचायत समितीच्या 134 गणासाठी गुरुवारी 16 रोजी मतदान घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या 67 गणासाठी एकुण 234 उमेदवार रिंगणात होेते. तर पंचायत समिती गणासाठी 520 उमेदवार रिंगणात होते. संपुर्ण जिल्ह्यात सरासरी 62.59 टक्के मतदान झाले.

बहुमत कोणत्याच पक्षाला नाही: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले. मतदानानंतर मतदारांच्या अंदाजानुसार कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही जे जवळपास निश्‍चित आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेवर कोण सत्ता स्थापन करेल यावर जिल्हावासीयांचे लक्ष आहे. सद्य स्थितीत जळगाव जिल्हा परिषदेवर युतीची सत्ता असुन यावर्षी दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुक लढत आहे. मागील पंचवार्षिक निवडणुक देखील स्वतंत्र लढण्यात आली होती.

कोण मारणार बाजी जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय संबोधले जात असल्याने याची निवडणुक सर्वच राजकीय पक्षासाठी महत्त्वाची आहे. जिल्हा परिषद संपुर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करीत असल्याने या निवडणुकीत सर्वच पक्षांनी सर्व जागेवर उमेदवार देण्याचे प्रयत्न केले आहे. ही निवडणुक आघाडी युती करुन लढवित आहे. तर भाजप, शिवसेना स्वबळावर लढत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडुण येण्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर कोण बाजी मारणार याकडे जिल्हाचे लक्ष लागुन आहे.

मतमोजणी ठिकाण
जळगाव-नुतन मराठा कॉलेज, भुसावळ- शासकीय गोदाम, यावल-हतनुर गोदाम ,बोदवड-तहसिल कार्यालय आवार, मुक्ताईनगर-तहसिल कार्यालय परिसर, रावेर-तहसिल कार्यालय परिसर, पाचोरा-सिंधी समाज मंगलकार्यालय, चोपड-बाजार समिती, अमळनेर-स्टेशन रोड इंदिरा भवन, पारोळा-नविन प्रशासकीय इमारत आवार, धरणगाव-तहसिल कार्यालय परिसर, भडगाव- उपबाजार समिती सभागृह, एरंडोल-आयटीआय कॉलेज परिसर, चाळीसगाव-हिरापूर रोड चव्हाण कॉलेज, जामनेर- बाजार समिती आदी ठिकाणी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा निकाल हाती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.