धुळे । सात वर्षांपासून विविध गुन्ह्यांतील जिल्ह्यातील 21 आरोपी फरार होते. हे आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक पोलिसांना चकमा देत होते. अखेर एलसीबीच्या पथकाने शोध मोहिम राबवून अवघ्या दहा दिवसात विविध ठिकाणांहून 21 फरार आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. यामुळे अन्य फरार आरोपींमध्ये दहशत निर्माण झाली असून लवकरच त्यांनाही बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता आहे. पोलीस अधिक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे, एलसीबीचे पोनि.रमेशसिंह परदेशी, एपीआय पंजाबराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने धुळे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये शोध मोहिम राबवून अवघ्या दहा दिवसात 21 फरार आरोपींना अटक केली.
एलसीबी पथकाची कारवाई
यासाठी एलसीबीच्या पथकाने आरोपींचे ’लोकेशन’ घेवुन कठोर मेहनत घेत दि.4 ते 18 डिसेंबर दरम्यान विशेष अटक मोहिम राबविली. याअंतर्गत 21 आरोपींना महाराष्ट्रासह इतर राज्यातून ताब्यात घेण्यात आले. यात उत्तम फकीरा पाटील, राजेंद्र उत्तम पाटील रा.अजंदे, ता.शिरपूर, गणेश सुभाष कोळी रा.अंतुर्ली, संतोष गुलाब बेलदार रा.कळमसरे दोंडाईचा, सुरेखा कोळी, पंडीत रामदास निकुंभे शिरपूर, सचिन मधुकर साळुंके देवारपाडा,ता. शिरपूर, वसंत पुना भील, पुना पौलाद भील, नसीम बी मेहतर शिरपूर यांना अटक झाली.
पोलीस महानिरिक्षकांचा आदेश
धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी हे फरार असल्याने त्यांच्यावरील गुन्ह्याबाबत चौकशी संदर्भात येणार्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या गुन्ह्यांसंदर्भात सोक्षमोक्ष लागत नव्हता. यामुळे फिर्यादींना न्याय मिळत नव्हता. यामुळे पोलीस प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी पोलीस महानिरिक्षक विनॉय चौबे यांच्या आदेशाने जिल्ह्यात ’पाहिजे फरार आरोपी’ अटक मोहिम राबविण्यात आली.
वरिष्ठांतर्फे पथकाचे अभिनंदन
भटू यासीन पटले, शिलदार जेलदार पावरा शिरपूर, ओमप्रकाश रामअवतार तायल सेंधवा, जाड्या पावरा, बंगड्या पावरा, गंगाराम पावरा, कोट्या पावरा रा.गधडदेव, चंदाबाई नाना भील, कांताबाई नाना भील रा.शहादा, विक्की पोपट मोहिते धुळे यांच्यासह धुळ्यातील एका मयत आरोपीचा यात समावेश होता. ही कारवाई एलसीबीच्या पथकातील हेकॉ.विंचूरकर, कापुरे, मोहने, मनोज पाटील, चेतन कंखरे यांनी केली. एलसीबीच्या पथकाला यश आल्याने त्यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले जात आहे.