जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती मागविली

0

जिल्हा प्रशासनाचे पोलीस अधीक्षकांना पत्र

जळगाव – कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होत असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे मागविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हि माहिती मागविण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले.
देशभरात कोरोना या आजाराने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा महाराष्ट्रातही प्रवेश झाला असल्याने सरकारी पातळीवर महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाला कोरोना या आजाराचा मुकाबला करण्याबाबत आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावरही प्रशासकीय यंत्रणांच्या बैठका सुरू आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोनासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. अजुनपर्यंत तरी जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळुन आलेला नाही. तरी देखिल प्रशासनाने खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

मार्च, एप्रिलमधील कार्यक्रमांची माहिती द्या

कोरोना या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याच आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यात होणार्‍या यात्रा, जत्रा, मेळावे, परिषदा, स्नेहसंमेलने, प्रदर्शने, सार्वजनिक उत्सव, धार्मिक कार्यक्रम यासंदर्भात माहिती मागविली आहे. तसे पत्र देखिल जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजना करण्याबाबत दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

जिल्ह्यात आज मितीला कोरोनाचा एकही संशयीत रुग्ण आढळून आला नसला तरी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी यापूर्वीच केलेले आहे. विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधक उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त आपत्ती व्यवस्थापन समिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 30 (2) अन्वये काम करित आहेत. जिल्ह्यातील आरोग्य, गृह, जिल्हा परिषद, मनपा, अन्न औषध प्रशासन, महसूल इत्यादि विभागाला कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत.

कडातर्फे जनजागृती सप्ताह

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमिवर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) या विभागामार्फत मार्फत 16 ते 22 मार्च दरम्यान जन जलजागृती सप्ताह अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियानात बॅनर्स,पोस्टर्स भिंती पत्रके लावण्यात यावेत तसेच रिक्षा,जीप/टेम्पो द्वारे प्रचार/प्रसार माईकसिस्टीम द्वारे करावा असे आवाहन करण्यात येत आहे.जन जलजागृती सप्ताह कार्यक्रम तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक, मुख्यअभियंता, जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी,अधीक्षक अभियंता आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याचे सहाय्यक अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र प्राधिकरण रा.रा.पाटील यांनी कळविले आहे.