धुळे । गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी असलेल्या जिल्हास्तरीय दक्षता पथकाची मासिक सभा नियमितपणे घ्यावी, ही सभा दरमहा पहिल्या सोमवारी होणार्या लोकशाही दिनापूर्वी घ्यावी तसेच जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची अचानक तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत दिले.
वेळावेळी अचानक भेटी द्याव्यात
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी झालेल्या बैठकीत यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे , प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. आर. व्ही. पाटील, डॉ. महेश मोरे, डॉ. रसिका निकुंभ, जयश्री शहा, विधी समुपदेशक मीरा माळी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, स्त्री भ्रूण हत्या हा विषय गंभीर आहे. स्त्री भ्रूण हत्या टाळण्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहभागाने प्रबोधनात्मक उपक्रम राबवितानाच या केंद्रांना वेळोवेळी अचानकपणे भेटी देवून पाहणी करावी. जेणेकरुन स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार टळतील. वैद्यकीय अधिकार्यांनी आपापल्या भागातील केंद्रांना अचानकपणे भेटी दिल्या पाहिजेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्यात.