पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची कौतुकाची थाप !
जळगाव : लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर जिल्ह्यातून इतरत्र जाण्यासाठी वा जिल्ह्या बाहेरून येण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून या माध्यमातून आजवर १८ हजार आबालवृध्दांना परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी महसूलचे पथक कार्यरत असून त्यांच्या कार्यप्रणालीचे ना. गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले आहे.
याबाबत वृत्त असे की, राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जळगाव जिल्हा प्रशासनाने २८ एप्रिलपासून जिल्ह्यातून बाहेर जाणार्यांसाठी आणि बाहेर जिल्ह्यातून जिल्ह्यात येणार्यांसाठी अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिलेली आहे. यासाठी जळगाव जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर परवानगीसाठी स्वतंत्र विभाग देण्यात आलेला आहे. येथे ऑनलाईन माहिती भरल्यानंतर याची छाननी होऊन परवानगी प्रदान करण्यात येते. तर बाहेरून जिल्ह्यात येणार्यांसाठी स्वतंत्र ई-मेल आयडी दिलेला असून यावर आलेल्या माहितीच्या आधारे परवानगी दिली जाते. याच्या जोडीला जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकदेखील दिलेले आहेत. ही प्रणाली यशस्वीपणे कार्यरत रहावी यासाठी उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुळकायदा विभागाचे अव्वल कारकून योगेश विठ्ठल पाटील, आस्थापनाचे अव्वल कारकून घनश्याम सानप, योगेश सिताराम पाटील व सुधीर सोनवणे यांचे पथक अविरत परिश्रम घेत आहेत. यासाठी स्वतंत्र कक्ष देण्यात आला असून येथे रात्री उशीरापर्यंत या प्रणालीचे कामकाज चालते.
२८ एप्रिलपासून १५ मे पर्यंत जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी वा जिल्ह्यात येणार्या एकूण १८,५७८ लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे. तर ६२९३ जणांचे अर्ज त्रुटीमुळे नाकारण्यात आलेले आहेत. २७१३ जणांच्या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. अर्थात, या कालावधीत एकूण २७५८४ जणांनी अर्ज केलेले आहेत. यात मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या रेड झोनमधील महानगरांचा अपवाद वगळता अन्य ठिकाणच्या स्थलांतरीतांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर जिल्ह्यातून बाहेर जाणार्या परप्रांतीयांना बस व रेल्वेगाडीची सुविधा देखील देण्यात आली आहे.
लॉकडाऊनमधील प्रवासाला परवानगी देण्यासाठी कार्यरत असणार्या पथकाला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले. लॉकडाऊनमध्ये अनेक जण जिल्ह्यात तर जिल्ह्यातील काही जण बाहेर अडकून पडल्याने त्यांची अडचण होत होती. महसूल पथकाच्या कामगिरीने त्यांना दिलासा मिळाला असल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले. दरम्यान, या पथकाने हेल्पलाईनवर आलेल्या सर्व शंकांचे अचूक व सविस्तरपणे निराकरण केले आहे. यात अनेक असाध्य विकारग्रस्तांना प्रवासाची परवानगी मिळाल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.