पुणे । जिल्ह्यातील 14 ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात पाच महिला ग्रामसेविकांचा समावेश आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात मासिक सभा, पंचायत समिती सभेतील उपस्थिती, लेखापरिक्षण, बायोगॅस कामास प्राधान्य देणार्या तसेच ग्रामपातळीवर वसुली, जमाखर्च आणि स्वच्छता मोहिम विशेष प्राधान्याने राबवून तालुक्यातील इतर गावांमध्ये सक्षम ग्रामसचिवालय बनविणार्या ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगीतले.
जिल्ह्यातील जे ग्रामसेवक उत्कृष्ट काम करतात त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून आदर्श ग्राम सेवक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येते. आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी प्रशासनाच्यावतीने ग्रामपातळीवर विविध योजना आणि निकष लावून काम करणार्या ग्रामसेवकांचे मूल्यांकन तपासण्यासाठी 100 गुणांच्या तक्त्याच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे. गावातील बंदिस्त गटारे, समाजकल्याण विभागाच्यावतीने मंजूर करण्यात आलेल्या कामांची अमंलबजावणी करणार्या ग्रामसेवकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श ग्रामसेवकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असल्याचे कोहिनकर यांनी सांगितले.
यांची झाली निवड
पुरस्कारामध्ये आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी गावचे ग्रामसेवक रविंद्र रामचंद्र उगले यांची निवड आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर बारामतीतील कांबळेश्वर गावच्या ग्रामसेविका अस्मिता चव्हाण, भोरमधील शिवरे गावचे सुरेश जगताप, भोरमधील 2014-15 सालचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वारवंड पांडे गावचे बापू बोराटे यांना जाहीर झाला आहे. तर दौंडमधील हिंगणीगाडा गावचे ग्रामसेवक दीपक बोरावके, हवेलीतील पेठ गावाच्या ग्रामसेविका शीतल आटोळे, इंदापूरमधील गंगावळण गावचे प्रमोद राजाराम पाटील, जुन्नरमधील डिंगोरे गावचे संजय जंजाळ, खेडमधील कान्हेवाडी बुद्रुक गावचे नीलेश पांडे, मावळमधील सांगवडे गावच्या स्वाती गोसावी, मुळशीतील मारणेवाडी गावच्या ग्रामसेविका कविता निकम, पुरंदरमधील पांडेेश्वर येथील शशिकला बाबासाहेब नवलेे, शिरुरमधील गणेगाव खालसा गावचे देविदास बबन विश्वास यांना तर वेल्हे येथील निगडे मोसे गावचे ग्रामसेवक परमेश्वर लगड यांची आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे.