गिरणा पट्ट्यातील गावांची केली पाहणी : खरीप बैठकीची औपचारीकता
जळगाव: संपुर्ण जिल्ह्यात दुष्काळाची परीस्थीती असतांना पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी 1501 गावांपैकी अवघ्या नऊ गावांचा धावता दौरा करून दुष्काळाचा आढावा घेतला. पालकमंत्र्यांच्या या धावत्या दौर्यामुळे शेतकर्यांसह जिल्हावासियांमध्ये तीव्र नाराजीचा सुर उमटत आहे. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता अधिकच तीव्र झाली आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथुन ऑडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हानिहाय दुष्काळाचा आढावा घेतला होता. त्यानंतर पालकसचिवांसह पालकमंत्र्यांना दुष्काळी दौरा करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. संपुर्ण जळगाव जिल्हा हा दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे. या दुष्काळाची तीव्रता जाणून घेण्यासाठी आज पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील हे जिल्हा दौर्यावर होते.
अवघ्या नऊ गावांना भेटी
जिल्ह्यात 1501 गावे हि दुष्काळाच्या छायेत आहे. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची मोठी बिकट परीस्थीती निर्माण झाली आहे. तसेच जनावरांना चारा देखिल उपलब्ध होत नसल्याने पशुपालक पशुधन विकण्याच्या मनस्थितीत आले आहे. अशा परीस्थीतीत शासनाकडुन दिलासा मिळण्याऐवजी त्यांची चेष्टा केली जात आहे. पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी गिरणा पट्ट्यातील नऊ गावांना भेटी देऊन त्याठिकाणी शेतकर्यांशी संवाद साधला. या दौर्यात शेतकर्यांना पालकमंत्र्यांकडे पीककर्ज, शेतीचे पाणी, जनावरांसाठी चारा छावण्या यासारख्या समस्या मांडल्या. यातील बहुतांश समस्यांवर पालकमंत्र्यांनी केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेली.
कर्ज घेऊन एफडी करणार्या शेतकर्यांची माहिती मागून थट्टा
खरीप आढावा बैठकीत पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांना झालेल्या कर्जवाटपाचा आढावा घेतला. कर्जवाटपाची माहिती देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक राठोड यांनी चक्क दांडीच मारली. त्यामुळे अचुक माहिती पालकमंत्र्यांना मिळाली नाही. दरम्यान पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी असे किती शेतकरी आहेत जे कर्ज घेऊन दुसर्या बँकेत एफडी करतात? असा सवाल करताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पालकमंत्र्यांनी शेतकर्यांप्रती केलेला हा सवाल म्हणजे त्यांची थट्टाच असल्याचे बोलले जात आहे.
खरीप बैठक निव्वळ फार्स
जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी दि. 26 एप्रिल रोजी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृषी विभागाने खरीप हंगाम पुर्वनियोजन आढावा बैठक घेतली होती. आज पुन्हा पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. कृषी अधिकार्यांनी नेहमीप्रमाणे योजनानिहाय आढावा सांगितला. या बैठकीत ठोस असा कुठलाही निर्णय न झाल्याने ही बैठक निव्वळ फार्स ठरल्याचे दिसून आले.
निवडणूक संपली जनता वार्यावर
लोकसभा निवडणूकीच्या मतदानाआधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारकडुन विविध योजनांचे अनुदान त्यांच्या खात्यात टाकण्यात आले होते. मात्र निवडणूका होताच हे अनुदान आता शासकीय फाईलींमध्येच अडकले आहे. निवडणूक संपल्यानंतर शासनाने जनतेला पुन्हा वार्यावर सोडल्याचे चित्र दिसून आले.