पुणे । सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, नाशिक, दौंड या भागात अनधिकृत डॉक्टर आणि रुग्णालयांमध्ये स्त्रीभ्रूण हत्येच्या घटना उघडकीस आल्याने राज्यातील गर्भलिंग निदान चाचणीचे बिंग फुटले. या गोरखधंद्याला वेसण घालण्यासाठी शहर, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण पातळीवर रुग्णालये आणि नर्सिंग होमची झाडाझडती सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 414 सोनोग्राफी सेंटरची झडती घेऊन रेकॉर्ड तपासण्यात आले आहेत. यापैकी 16 सोनोग्राफी सेंटरमध्ये मासिक अहवाल व एफ फॉर्ममध्ये त्रुटी आढळल्याची माहिती समोर आली आहे.
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने काही वर्षापूर्वी अनेक सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली होती. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सोनोग्रॉफी सेंटरना ऑनलाइन एफ फॉर्म भरणे सक्तीचे केले गेले होते. दिवसभरातील रुग्णांच्या नोंदी, रूग्णांची संपूर्ण माहिती, तसेच महिलेला सोनोग्राफी व गर्भजल तपासणी कशासाठी करायची आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे या फार्ममध्ये भरणे गरजेचे असते. सोनोग्राफी सेंटरमध्ये प्रत्येक दिवासाची रूग्णांची नोंद व्यवस्थित करण्यात येत नसून ऑनलाईन पद्धतीने एफ फॉर्म भरले जात नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निर्दशनास आले आहे. तसेच रजिस्टरमध्ये रुग्णांची नोंदणी अर्धवट असलेल्या त्रुटी पुन्हा आढळल्या आहेत.
स्त्रीभू्रण हत्या रोखण्यासाठी संपूर्ण राज्यभर 15 एप्रिलपर्यंत महापालिकेच्या आरोग्य विभागासह पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अधिकार्यांची समिती बनवून गर्भपात केंद्र, प्रसुतीगृह व सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्यास सुरूवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 70, सोलापूरमध्ये 107, पिंपरी – चिंचवड भागात 43 सोनोग्राफी सेंटर, दवाखाने, प्रसुतीगृहांची तपासणी करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये किरकोळ त्रुटी आढळल्या असून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या सेंटरमध्ये काही ठिकाणी गैरप्रकार चालू असल्याचा संशय असून कारवाई करणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका उपआरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.
पुण्यात आत्तापर्यंत 414 सोनोग्राफी सेंटरची तपासणी केली असून त्यामध्ये 16 सेंटरमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. या सेंटरवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. तसेच स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहेत.
डॉ. हनुमंत चव्हाण, जिल्हा उपआरोग्यसंचालक