जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींचा वाळू लिलावास विरोध

0

प्रशासनाची डोकेदुखी वाढणार : ठरावांची प्रशासानाला प्रतिक्षा

जळगाव – नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यात लवकरच वाळू गटांचे लिलाव करण्यात येणार आहे. वाळू गटांच्या लिलावासाठी प्रस्ताव त्वरित पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले असले तरी, जिल्ह्यातील 18 ठिकाणी वाळू गटांच्या लिलावास ग्रामपंचायतीनीं विरोध दर्शविला आहे.

18 ग्रामपंचायतीनीं होकार दिला, तर 73 ग्रामपंचायतीनी वाळू गटांचे लिलाव करण्याचे प्रस्ताव पाठविले नाही. दरम्यान ग्रामपंचायतींनी प्रतिकुल ठराव दिल्यामुळे याठिकाणी प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच सहा महिन्यांपासून वाळू ठेके बंद आहेत. यामुळे वाळूची चोरी वाढली आहे.वाळू ठेके लिलावात गेले तर वाळू चोरीस आळा बसणार आहे. जिल्ह्यात 91 ठिकाणी वाळू लिलावाचे गट शोधण्यात आले आहेत. तेथील ग्रामपंचायतीनीं ठराव करून आमच्या गावातील नदीपात्रातील वाळू गटांचे लिलाव करावेत असे ठराव ग्रामसभेत घेऊन ते तालुकास्तरीय समितीकडे पाठवायचे असतात. जिल्हाधिकार्‍यांनी पंधरा दिवसाच्या आत वाळू गटांच्या लिलावाबाबत प्रस्ताव पाठविण्याचे आदेश मागील आठवड्यात दिले होते.
यामुळे तालुकास्तरीय महसूल यंत्रणा कामाला लागली. त्यांनी वाळू गट असलेल्या ग्रामपंचायतींना वाळू लिलावाबाबत प्रस्ताव देण्यास सांगितले. मात्र त्यातील काहींनी होकार दिला, काहींना नकार दिला तर काहींनी प्रस्ताव पाठविला नाही.

असा आहे वाळू लिलाव ठरावांचा तपशील


तालुका प्रस्तावित गट होकार दिलेल्या ग्रामपंचायती नकार दिलेल्या ग्रामपंचायती अप्राप्त प्रस्ताव

रावेर 10- 6 4 0

चोपडा 11 0 0 11

धरणगाव 15 3 12 0

पाचोरा 3 0 0 3

भडगाव 2 0 0 2

एरंडोल 5 0 0 5

यावल 4 2 2 0

पारोळा 10 0 0 10

अमळनेर 15 0 0 15

भुसावळ 7 7 0 0

जळगाव 9 0 0 9