जळगाव। गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे जिल्ह्यातील 2 हजार 662 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर लवकरच जिल्ह्यातून 42 जणांना हद्दपार करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यातच सहा जणांना जिल्ह्यातून बाहेर तडीपार करण्यात आले आहे.
42 जण जिल्ह्यातून हद्दपार होणार
25 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यातच जिल्ह्यात यंदा दोन हजार 350 संभाव्य मंडळाकडून ‘श्री’ स्थापना होण्याचे संकेत असून 100 गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसात हा आकडा जास्त किंवा कमीही होऊ शकतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, प्रशांत बच्छाव हे महत्वाच्या ठिकाणी तसेच संवेदनशील भागात स्वत: भेटी देऊन आढावा घेत आहेत. तसेच उपविभागीय अधिकार्यांनाही त्यांच्या उपविभागात शांतता समितीच्या बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस स्टेशन स्तरावर त्यांच्या हद्दीतील गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांच्या बैठका सुरु आहेत. तसेच यंदा 23 ऑगस्टपर्यंत मंडळांना मंजुरी दिली जाणार आहे.
लवकरच एमपीडीएची कारवाई
जिल्हा पोलीस दलाच्यावतीने अमळनेर व जळगाव येथील प्रत्येकी एका जणाविरुध्द एमपीडीएची कारवाई केली आहे. आणखी पाच जणांचे प्रस्ताव तयार आहेत. या आठवडाभरात या प्रस्तावांना मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळगाव व भुसावळ या दोन उपविभागातील गुन्हेगारांवर ही कारवाई होणार आहे. गणेशोत्सव काळात जिल्हाभरात 12 ठिकाणी पोलिसांचे तपासणी नाके सुरु करण्यात आले आहेत.