जिल्ह्यातील 21 पैकी 8 वाळू घाटांचा लिलाव

0

जळगाव: जिल्ह्यातील गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या 21 वाळू गटांच्या ई-निविदा बुधवारी उघडण्यात आल्या. यात 8 वाळू गटांचा 10 कोटी 88 लाख 60 हजार 613 रुपयांमध्ये ई-लिलाव करण्यात आला. या लिलावामध्ये वाळू व्यावसायिक, ठेकेदारांनी 786, 1 हजार 1,999 आणि 313 अशा लकी क्रमांकासह सर्वोच्च बोली लावली.

पर्यावरण समितीच्या परवानगीनंतर 2020-21 या वर्षासाठी 9 जूनपर्यंतच्या मुदतीसाठी 21 वाळू गटांचा ई-लिलावाची प्रक्रिया राबवण्यात आली. 4 ते 15 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यात आली. 19 जानेवारीपर्यंत ई-लिलावात भाग घेणार्‍या व्यक्ती, संस्थांना वाळू गटाची 25 टक्के इसारा रक्कम जमा केली. ई-लिलाव बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत करण्यात आला. दुपारी 3 वाजेनंतर ई-निविदा उघडण्यात आल्या. बांभोरी प्रचा (ता. धरणगाव) या वाळू गटासाठी पटेल ट्रेडिंगने 1 कोटी 41 लाख 9 हजार 786 रुपयांची, घाडवेल (ता. चोपडा) वाळू गटासाठी नीलेश सुधाकर पाटील यांनी 1 कोटी 71 लाख 1 हजार 10 रुपयांची, आव्हाणी (ता. धरणगाव) वाळू गटाचा स्टार बालाजी ऑनलाईन लॉटरीतर्फे 1 कोटी 44 लाख 34 हजार 584 रुपयांची, नारणे वाळू गटासाठी सुनंदाई बिल्डर्सने 1 कोटी 71 लाख 1 हजार 10 रुपयांची, टाकरखेडा (ता.एरंडोल) वाळू गटासाठी व्ही. के. इंटरप्रायजेसने 61 लाख 21 हजार 111 रुपयांची, वैजनाथ (ता. एरंडोल) वाळू गटासाठी श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरने 58 लाख 99 हजार 999 रुपयांची, उत्राण (ता. एरंडोल) अ. ह. वाळू गटासाठी एम. एस. बिल्डर्सने 2 कोटी 52 लाख 313 रुपयांची, उत्राण अ.ह.2 वाळू गटाचा महेश सदाशिव माळी यांनी 1 कोटी 25 लाख 83 हजार रुपयांची सर्वोच्च बोली लावून लिलाव घेतला. 21 वाळू गटांच्या लिलावासाठी 28 कोटी 64 लाख 85 हजार 736 रुपये अपसेट प्राईस निश्चित करण्यात आली होती.