जिल्ह्यातील 21 वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू

0

पर्यावरण समितीच्या मंजुरीनंतर प्रशासनाची लगबग

जळगाव: जिल्ह्यातील वाळु घाटांची लिलाव प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून रखडली होती. राज्याच्या पर्यावरण समितीकडे 27 वाळू घाटांचे प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 21 वाळु घाटांना मंजूरी देण्यात आली असल्याने त्याच्या लिलाव प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील वाळु घाटांची लिलाव प्रक्रिया वर्षभरापासून रखडली होती. तसेच कोरोनामुळेही वाळुच्या लिलाव प्रक्रियेला ब्रेक लागला होता. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा नव्याने लिलाव प्रकियेला सुरवात करण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यातील 27 वाळु घाटांचे भूजल विभागाचे सर्वेक्षण करण्यात आले.
त्यानंतर हे प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण समितीकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आले. तब्बल दोन ते तीन महिन्यानंतर राज्याच्या पर्यावरण विभागाची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील 27 पैकी 21 वाळु घाटांच्या लिलावांना पर्यावरण समितीने मंजूरी दिली. पर्यावरण समितीच्या मंजूरीनंतर जिल्हा खनीकर्म विभागातर्फे वाळु घाटांच्या लिलावासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. साधारणत: पुढील आठवड्यात वाळु लिलावाचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता प्रशासकीय सुत्रांनी वर्तविली आहे. लिलावाचा मार्ग मोकळा झाल्याने जिल्ह्यात होणार्‍या वाळु चोरीवर काही अंशी नियंत्रण येणार आहे.

असे आहेत वाळू घाट
वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बु., केर्‍हाळे बु., धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी, घाडवेल, धावडे, सावखेडा, बांभोरी प्र.चा., आव्हाणी, नारणे, टाकरखेडा, वैजनाथ, उत्राण अ.ह., उत्राण अ.ह., भोकर, पळसोद, या 21 घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घाटांची प्रस्तावित किंमत 28 कोटी 64 लाख 85 हजार 736 रूपये निश्चीत करण्यात आली आहे.