जिल्ह्यातील 383 ग्रा.पं. जुलैपासून डिजिटल होणार

0

रत्नागिरी – ग्रामपंचायतींचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा तसेच लोकांना विविध शासकीय सेवा निश्‍चित वेळेत उपलब्ध व्हाव्यात या हेतूने पहिल्या टप्प्यात जिल्हयातील 383 ग्रामपंचायतींचा कारभार येत्या जुलैपासून डिजिटल पध्दतीने सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबर केबल नेटवर्कने जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे येथील बीएसएनलच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात हे काम दोन टप्प्यात सुरू आहे. पहिल्या टप्प्यासाठी 30 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी, संगमेश्‍वर, खेड व मंडणगड या तालुक्यातील 383 ग्रामपंचायतींना प्राधान्य देण्यात आले आहे. या ग्रामपंचायतींना नेटवर्कने जोडण्याची कार्यवाही पूर्णत्वाकडे गेली असल्याचे येथील बीएसएनएलच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या ग्रामपंचायती जोडण्यासाठी 773 कि.मी.ची फायबर ऑप्टीकल केबल टाकण्यात आली आहे. येत्या जुन महिन्यात डिजिटल कारभार सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध होणार आहे.