जळगाव । जिल्ह्यातील पाच नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रस्तावास शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने तत्वतः मान्यता दिली असून त्यासाठी 7 कोटी 13 लक्ष रुपयांचा निधीही मंजूर केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जळगाव यांना ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभागाकडून पत्र प्राप्त झाले असून जिल्ह्यातील नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत पाच नद्यांवर 21 सिमेंट नाला बांध बांधून त्याद्वारे पाणी अडवून नदी पुनरुज्जीवन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत संबंधित क्षेत्रात करावयाची नाला जलसंधारण उपचार व क्षेत्र जलसंधारण उपचाराची कामेही अंतर्भूत करावीत व प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवा असे सांगण्यात आले.
7 कोटी 13 लाखांचा निधी मंजूर
रावेर तालुक्यातील बोकड नदीवर 8 बंधारे, पाचोरा तालुक्यातील सोनद नदीवर 3 बंधारे, उतावळी नदीवर 7 बंधारे, हिवरा नदीवर एक तर चोपडा तालुक्यातील चंपावती नदीवर 2 बंधारे अशा एकूण 21 बंधार्यांच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच बोकड नदीवरील बंधार्यांसाठी 1 कोटी 84 लाख 33 हजार रुपये, सोनद नदीवरील बंधार्यांसाठी 1 कोटी तीन लक्ष 58 हजार रुपये, उतावळी नदीवरील बंधार्यांसाठी 1 कोटी 86 लाख 5 हजार रुपये, हिवरा नदीवरील बंधार्यासाठी 85 लाख 2 हजार रुपये तर चंपावती नदीवरील बंधार्यांसाठी 1 कोटी 53 लाख 42 हजार रुपये असे एकूण 7 कोटी 13 लाख 3 हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या कामांबाबतचा सविस्तर प्रस्ताव सक्षम अधिकार्यांकडून दिलेल्या तांत्रिक मंजूरीसह व जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या प्रशासकीय मान्यतेसह अधिक्षक अभियंता लघुसिंचन यांनी सविस्तर निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच असे पत्र अवर सचिव यांच्या कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्याची माहितीही जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी दिली आहे.