जळगाव । विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीची पहिली पायरी म्हणून अंगणवाडी मानली जाते. इंग्रजी माध्यमांच्या प्ले गृप व नर्सरीच्या शाळा स्पर्धेत पुढे गेल्याने ग्रामिण भागात अंगणवाडीतील किलबिलाट कमी झाला आहे. अंगणवाड्यांना नवसंजीवनी देण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. मात्र अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्यांकडेच शासनाने दुर्लक्ष केले आहे. गेल्या चार महिन्यापासून अंगवाडी कर्मचारी संघटनांकडून विविध मागण्यासाठी शासनाकडे पाठपूरावा करण्यात येत आहे. मात्र शासन सकारात्मक भूमिका घेत नसल्याने अंगणवाडी कर्मचार्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. अंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी हा संप केला जाणार आहे. संपात जिल्ह्यातील 9 हजार अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात एकुण साडेचार हजार अंगणवाड्या आहेत. संपामुळे या सर्व अंगणवाड्या पुर्णतःबंद ठेवण्यात आल्या होत्या.
शासनाने दखल घ्यावी
शनिवार हा संपाचा पहिला दिवस असल्याने फारसा परिणाम जाणवला नाही मात्र संपाची दखल न घेतल्यास याचे परिणाम जाणवतील. दरम्यान पहिल्या दिवशी लहान बालके, कुपोषीत बालके हे पोषण आहारापासून वंचीत राहिल्याचे दिसून आले. कर्मचार्यांच्या संपामूळे राज्यातील सुमारे 2 लाख 11 हजार अंगणवाडी सेविका कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपा दरम्यान अंगणवाडी केंद्राचे कोणतेही काम केले जाणार नसून कर्मचारी बैठका, कार्यशाळा तसेच प्रशिक्षणास हजर राहणार नाहीत याबाबत आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी माहिती दिली.