जिल्ह्यात आगामी खासदार महाविकास आघाडीचाच

0

जळगाव: जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात सत्तांतर झाल्याने या निवडणुका लढतांना कार्यकर्त्यांसमोर पेच आहे. असे असले तरी ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे तिथे स्वत: आणि जिथे आपण कमी आहोत त्याठिकाणी आघाडी म्हणून काँग्रेस-राकाँशी जुळवुन घेण्याचा सल्ला शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना आज झालेल्या जिल्हा बैठकीत दिला. दरम्यान आगामी खासदार हा महाविकास आघाडीचा राहणार असल्याचा दावा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केला.

जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रणनिती ठरविण्यासाठी आज शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शिवसेनेची जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे होते. तर व्यासपीठावर जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. संजय सावंत, शिवसेना नेते आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, शिवसेना नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन बरडे, प्रशांत नाईक, इब्राहीम पटेल, महिला आघाडीच्या मंगला बारी, शोभा चौधरी, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात पालकमंत्र्यांसह जिल्हा नेत्यांनी मार्गदर्शन केले.