पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे आवाहन
रस्ता सुरक्षा अभियानाचा समारंभ
मावळते व नूतन जिल्हाधिकार्यांचा स्वागत समारंभ
जळगाव- देशासह जिल्ह्यात दरवर्षी अपघातात मृत्यू होणार्यांची संख्या चिंतनाची बाब आहे. मृत्यूदर कमी व्हावे याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहे. पोलिसांच्या नाकाबंदीचा उपयोग नसून विद्यार्थ्यांनी घरातच नाकाबंदी करुन विना हेल्मेट आई वडीलांना घराबाहेर पडू देवू नये, हे घडल्याशिवाय अपघात कमी होणार नाही. त्यामुळे एकही नियम मोडणारा भेटण्याचा पोलिसांसाठी जिल्ह्यात सोनियाचा दिवस येवो, अशी अपेक्षा पोलीस दत्तात्रय शिंदे यांनी रस्ते सुरक्षा अभियानाच्या समारोपाप्रसंगी व्यक्त केली.
4 ते 10 फेब्रुवारीदरम्यान सुरु असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सोमवारी समारोप झाला. त्यानिमित्ताने पोलीस मैदानाजवळील मंगल सभागृहात विविध स्पर्धा तसेच कर्मचार्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पारितोषिक वितरण सोहळा झाला. तसेच यावेळी मावळते जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना पोलीस दलातर्फे निरोपही देण्यात आला तर नूतन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचा स्वागत समारंभही झाला. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, नूतन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी उपस्थित होते. प्रास्ताविककात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील त्याच्या विभगााच्या कामकाजाची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख तर आभार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांनी केले. यावेळी पोलीस अधीकारी, कर्मचार्यांसह नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
अपघातग्रस्ताला मदतीचा सेल्फी काढून लाईक मिळवा
प्रत्येकाच्या हाता स्मार्टफोन पडला आहे, तसेच सोशल मिडीयामुळे अपघातानंतर काही जण मदत करण्याऐवजी अनेक जण अपघातग्रस्तासह त्याच्या वाहनासोबत सेल्फी काढून तो सोशल मिडीयावर टाकतात. याबाबत दत्ता शिंदे यांनी शोकांतिका व्यक्त केली. ते म्हणाले प्रत्येकाने अपघातग्रस्ताला मदतीसाठी 2 मिनिट द्यावे, प्रथमोपचार करुन त्याला रुग्णालयात पोहचवावे व या मदतीचा सेल्फी काढून तो सोशल मिडीयावर टाकून मोठ्या लाईक मिळविले पाहिजे, जेणेकरुन तुम्हाला या कार्याचे आत्मसमाधान मिळून याव्दारे जगात न मिळणारा आनंद मिळेल असेही ते म्हणाले.
निंबाळकरांना पोलीस दलातर्फे विवेकानंदाची मूर्ती
मावळते जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकरांना शाल, वृक्षाचे रोप तसेच विवेकानंदाची मूर्ती भेट देवून पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी निरोप दिला. तसेच नूतन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी निंबाळकर यांच्या हस्ते हुंडाईने तयार केलेल्या वाहतूक सुरक्षेबाबतच्या पुस्तकाचेही विमोचन करण्यात आले.
विद्यार्थ्यांसह कामगिरीबद्दल कर्मचार्यांना पारितोषिक
रस्ता सुरक्षा अभियानात शहर वाहतूक शाखेतर्फे निबंध स्पर्धा झाली. यातील विजेते विद्यार्थी विजय कोळी, अंकिता विनोद प्रजापत, प्रतिक्षा युवराज पाटील यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल उपप्रादेशिक परिवहन विभागाचे परिवहन कर वसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे, राकेश शिरसाठ तसेच अभियानादरम्यान सर्वांत जास्त केसेस करणारे शहर वाहतूक शाखेचे राजेंद्र उगले, सुनीता प्रतापराव पाटील, धीरज तडवी, योगेश पाटील, सोपानदेव पाटील आदींचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जनजागृतीत सहभागी या संस्था कंपनीचाही गौरव
रस्ता सुरक्षा अभियानात जनजागृती तसेच विविध कार्यक्रमासाठी सहकार्य करणार्या रोटरी ईस्ट , लायन, सुप्रिम लिमिटेड, हुंडाई, रेमंड, अपर्णा ऑटोमोटीव्ह, प्रचिती मेडीया, वीर सावरकर रिक्षा युनीयन, इंडीयन रेडक्रॉस सोसायटी, मुक्ती फाऊंडेशन, प्रतिभा हॉस्पिटल, विवेकानंद नेत्रालय यांचाही यावेळी प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
वाहतूक सुरक्षेसाठी 3 ई महत्वाचे
वाहतूक सुरक्षेसाठी 3 ई म्हणजे इंजिनिअरींग , एज्युकेशन व ईमफोर्समेंट हे महत्वाचे असल्याचेही दत्ता शिंदे यांनी सांगितले. इंजिनिअरींग म्हणजे रस्ते निर्मिती करतांना योग्य वळण, योग्य ठिकाणी स्प्रीडब्रेकर अशा पध्दतीने लक्ष दिले जावे. एज्युकेशन म्हणजे नियमांबाबत जागरुकता व ईमफोर्समेंट म्हणजे नियमांची अंमलबजावणी. या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्यास अपघात टाळता येतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
जिल्हावासियांचे प्रेम कायम स्मरणात राहिल
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर म्हणाले की, जिल्ह्यात सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी पाठबळ लाभले. तसेच जिल्हावासियांकडून प्रेम व सहकार्य मिळाले. हे सर्वांचे प्रेम कायम स्मरणात राहील,असेही ते म्हणाले. तर नूतन जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी किशोराजेंना पुढील वाटचालीस शुभेच्छा असून आमच्या मंत्रालयाचे आमचे ह्क्काचे म्हणून निंबाळकर यांचे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. दत्ता शिंदे यांनी सांगितलेल्या 3 ई पैकी कार्यक्रमात रस्ते निर्मितीला अनुसरुन एकही विभागाचा प्रतिनिधी नसल्याचा प्रश्नही ढाकणे यांनी उपस्थित केला.