जिल्ह्यात ऑक्सीजनची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

तातडीच्या बैठकीत प्राणवायूच्या पुरवठ्याचे नियोजन ; ऑक्सिजन कंपन्यांच्या मालकांना धरले धारेवर

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाच्या उपचारासाठी वाढीव प्राणवायूची मागणी पाहता जिल्ह्यास प्रति दिवशी ४५ ते ५० टन लिक्वीड ऑक्सीजनची मागणी असली तरी पुरेशा प्रमाणात टँकर उपलब्ध नसल्यामुळे १५ ते २० टन ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. या पार्श्‍वभूमिवर, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने बैठक घेऊन प्राणवायूचा पुरवठा करण्याचे नियोजन केले. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात ऑक्सीजनचा तुटवडा भासू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिली. तसेच त्यांनी जिल्ह्यात लिक्वीड ऑक्सीजनचा समान पुरवठा करण्याची मागणी केली त्या बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, आयुक्त अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त काळे व कंपन्यांचे मालक यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून या अनुषंगाने ते आज रात्री मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत.
याबाबत वृत्त असे की,जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असून यामुळे साहजीकच प्राणवायूची मागणी देखील वाढली आहे. जिल्ह्यात आज रोजी १२ हजार इतक्या सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज सायंकाळी जिल्हा प्रशासनासोबत तातडीची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला आमदार किशोर पाटील, निवासी उपजिल्हा अधिकारी राहुल पाटील, औषध निरीक्षक डॉ. अनिल माणिकराव,सिव्हील सर्जन एन. एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी, ऑक्सिजन उत्पादित करीत असलेल्या हिंदुस्थान गॅसेस, शिवम गॅसेस व हर्षिता गॅसेसचे संचालक उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आरोग्य खात्याचे सचिव, अन्न व औषध खात्याचे आयुक्त, लिक्वीड ऑक्सीजनचा पुरवठा करणारी कंपनी लिंडेचे मालक श्री. बॅनर्जी यांच्याशी प्राणवायूच्या पुरवठ्याबाबत चर्चा केली. जिल्ह्यात हर्षीता गॅसेस प्रा. लि., शिवम ऑक्सीजन प्रा. लि., जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि गोदावरी हॉस्पीटल असे चार ऑक्सीजनचे प्लाँट कार्यरत आहेत. जिल्ह्यासाठी दररोज ४५ ते ५० टन इतक्या ऑक्सीजनची आवश्यकता आहे. मात्र याचे वहन करण्यासाठी टँकर्स उपलब्ध नाहीत. यामुळे ऑक्सीजनचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांनीच टँकर्सचा पुरवठा करावा अशी सुचना ना. गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत केली. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, अन्न व औषध मंत्री, तसेच दोन्ही खात्याच्या सचिवांना आपल्या मागण्यांचे पत्र रवाना केले आहे. जळगाव जिल्ह्यावर ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात अन्याय होऊ नये अशी आपली मागणी असून आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आज रात्री व्हिसीवरून चर्चा करणार असल्याची माहिती सुध्दा ना. पाटील यांनी या बैठकीत दिली. तर कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील रूग्णांना प्राणवायूची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही सुध्दा त्यांनी याप्रसंगी दिली.