जळगाव – करपंल पान देवा जळंल शिवार उरी नाही जीव सांडला….. खेळ मांडला… असेच म्हणण्याची वेळ जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांवर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या वादळी वार्यासह अवकाळी पावसामुळे तब्बल २५०० हेक्टरवरील केळी पिक अक्षरश: डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाली. जवळपास १५० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषि विभागाने वर्तविला आहे. पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असून अहवाल तातडीने शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात दि. २०, २७ आणि ३० मे रोजी वादळी वार्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले. कापणीला आलेले पिकही शेतकर्याच्या हातून गेले आहे. दि. २० मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव, यावल, अमळनेर, पारोळा, एरंडोल, चोपडा आणि जामनेर या तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले. त्यात ३५.४८ हेक्टर क्षेत्रावरी केळी पिक अक्षरश: झोपले. दि. २७ मे रोजी या वादळी पावसाची तिव्रता अधिक होती. रावेर, मुक्ताईनगर आणि चोपडा या तीन तालुक्यांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आणि तब्बल २११२.४० हेक्टर क्षेत्रावरील केळी बघता बघता उद्ध्वस्त झाली. त्यानंतर दि. ३० मे रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे चोपडा, धरणगाव, भुसावळ आणि यावल तालुक्यात २०४.५६ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले. तीन दिवसात साधरणत: २५०० हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे १५० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषि विभागाने वर्तविला आहे. डोळ्यादेखत हातचे आलेले पिक नष्ट झाल्याने शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला आहे. प्रशासकीय पंचनामे होत राहतील पण शेतकर्याला पुन्हा उभे करण्यासाठी शासनाने निकष वगळता सरसकट भरीव मदत करावी अशी मागणी होत आहे.
बांधावर पिकाची संरक्षक भिंत हवी
वादळ, वारा, अवकाळी पावसामुळे केळी या पिकाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतकर्यांनी बांधावर बांबु, हादगा अशी लागवड करून संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाकडुन अनुदानही मिळते. शेतकर्यांनी बांधावरील पिकाचा प्रयोग केल्यास केळीचे नुकसान निश्चीतपणे कमी करता येईल.
संभाजी ठाकुर
– कृषि अधीक्षक, जळगाव