जिल्ह्यात दुबार पेरणीचे सावट

0

अमळनेर । जून महिना अर्धा होवूनही तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने लागवड व पेरण्या झालेल्या शेतकर्‍यांची चिंता वाढली असून येत्या दोन दिवसात जर मान्सून तालुक्यात सक्रिय नाही झाला तर दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांना ओढवणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल झालेला मान्सून गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामाची जोरदार तयारी केलेल्या शेतकर्‍यांचा जीव भांड्यात सापडला असून दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर आले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस तालुक्यातील काही भागात दाखल झाला होता. शेतकरी वर्गात या पाऊसामुळे आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र यंदा सुरवातीला झालेल्या तीन दिवस दमदार पावसाने शेतकर्‍यांच्या अशा पल्लवित केल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर शेतकर्‍यांनी मशागतीची कामे व खरिपाच्या पेरण्या करण्यात आले.

आठवड्यापासून पावसाची दांडी
यंदा महाराष्ट्रात 10 जूनपासून दमदार पाऊसाची हजेरीचे अंदाज हवामान खात्याने दिले होते. यामुळे शेतकर्‍यांच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शेतकरी वर्गात याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र गेल्या सहा दिवसापासून पाऊसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर बनला आहे. तर खरिपाची केलेली पेरणी वाया जात आहे. यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. जून महिन्याच्या सुरवातीला तालुक्यात पावसाने जोर धरल्यामुळे शेतकर्‍यांनी कपाशी लागवड सह पेरणीस सुरवात केली होती. परंतु आता अर्धा महिना उलटूनही पाऊस पडत नसल्यामुळे तालुक्यात 75 टक्के हेक्टर मध्ये दुबार पेरणी करावी लागणार आहे तालुक्यात दरवर्षी 62.678 हेक्टर क्षेत्र हे लागवड व पेरणीसाठी वापरले जाते. त्यात 15 जूनपर्यंत 2915 हेक्टर जमीनीत शेतकर्‍यांना पेरा केलेला आहे. त्यात 2780 हेक्टर कपाशी, 200 हेक्टर मूग व 100 हेक्टर मध्ये उडीद तर काही हेक्टरमध्ये बाजरी व ज्वारीची पेरणी झालेली असल्यामुळे तालुक्यातील 2000 हेक्टर मध्ये म्हणजेच सुमारे 75 टक्के हेक्टर क्षेत्र दुबार पेरणी करावी लागणार आहे.

उत्पन्नात घट होण्याची शक्यता
सततची नापिक, दुष्काळ व आता मान्सून लांबल्याने दुबार पेरणीचा फटका बसणार आहे. यावर्षी मृगाची पेरणीही शेतकर्‍यांना सापडली नाही. त्यामुळे अनिश्‍चिततेचे सावट आहे. पाऊस लांबल्यास सरासरी उत्पन्नात घट होणार असल्याने अनेक तर्कविर्तकाबाबत चर्चा केली जात आहे. अशा प्रकारे शेतकरी आता निसर्गाचा कोप व शासनाचे दुटप्पी धोरण असल्यामुळे वरूण राज्याच्या आगमनासाठी साकडे घालत आहे.

तालुकाभरातील शेतकर्यांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कापसाची पेरणी केली. मात्र, यंदाही सर्व वाया जाण्याची भिती आहे. हजारो रूपये किमतींचे बियाणे शेतात टाकण्यात आले आहे. मात्र, हे बियाणे पूर्ण वाया जाणार की काय अशी चिंता आहे.
– रामलाल पाटील, शेतकरी शिरुड